संख्या कमी होत नसल्याने अत्यावश्यक सेवांनाही ब्रेक
औषध आणि दूध वितरण वगळता इतर बाबींवर निर्बंध
*संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता जिल्ह्यासाठी मास्टर प्लान तयार*
*पुढील १५ दिवस पुन्हा जनता कर्फ्यू पाळण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन*
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: : जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी आपण जनता कर्फ्यू पुकारला. कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु केली. मात्र, अद्यापही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील १५ दिवस अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने आणि दूध वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, नागरिकांचे आरोग्य सर्वांत महत्वाचे असून ते जपणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पुढील तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी आणि या दोन कोरोना लाटांचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. त्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने आता कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. ग्रामपातळीवरील दक्षता समित्या आणि नागरी भागातील प्रभाग समित्यांनी आता क्रियाशील होण्याची आवश्यकता आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑक्सीजनची उपलब्धता, औषधांची उपलब्धता, बेडस् उपलब्धता या बाबींकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा नियोजन ऩिधीतील ३० टक्के रक्कम कोविड उपाययोजनांसाठी उपयोगात आणण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती प्लान्टसाठी ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून अहमदनगर, कर्जत, श्रीरा्मपूर, पाथर्डी, संगमनेर येथे २५० जम्बो सिलींडर दैनंदिनरित्या भरतील एवढ्या क्षमतेने ऑक्सीजन निर्मिती अपेक्षित असून लवकरच त्यासंदर्भातील निर्णय होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या आपण १०० ऑक्सीजन कॉ़न्स्नट्रेटर प्राप्त करुन घेतले आहेत. त्यासाठी ४६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणाऱ्या बाबींव्यतिरिक्त जिल्ह्यातील आमदार महोदयांनी त्यांचा निधी आरोग्यविषयक त्या-त्या भागातील अत्यावश्यक सुविधांसाठी उपयोगात आणावा, अशी सूचनाही श्री. मुश्रीफ यांनी केली. आगामी काळात जिल्ह्यासाठी लागणारी औषधांची गरज लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयास या बाबींसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर एकच लॅब आहे. अजून एक लॅब निर्मितीसाठीही निधीची उपलब्धता करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यासह इतरत्रही मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम झाले. लोकांची गर्दी वाढली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढला. त्यामुळे यंत्रणांवर ताण आल्याचे सांगून पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नागरिकांनी आता स्वत:च्या आणि इतरांच्याही आरोग्याचा विचार केला पाहिजे. विनाकारण बाहेर पडणारे नागरिक संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे आता होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करुन रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले गेले पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामदक्षता समिती आणि प्रभाग समित्यांनी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांबाबत कडक धोरण अवलंबले होते. आता तीच पद्धत अवलंबली गेली तरच संसर्गाला आळा बसू शकेल. असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सध्या रेमडेसीवीर वाटप महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र याप्रमाणे केले जात आहे. सध्या पाहिजे त्याप्रमाणात रेमडेसीवीर उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती असली तरी जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेला साठा हा नागरी भाग आणि ग्रामीण भागासाठी समप्रमाणात वाटप केले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जनता कर्फ्यू पुकारुनही जिल्ह्याच्या कोरोना बाधितांच्या टक्केवारीत कमी आलेली नसल्याने आता निर्बंध आणखी कडक करण्याची वेळ आल्याचे सांगून ते म्हणाले. आता मेडीकल आणि दूध वगळता इतर बाबींवर बंधने आणली गेली पाहिजेत. महानगरपालिका क्षेत्रात भाजीपाला केवळ द्वार वितरण पद्धतीप्रमाणे करण्यास परवानगी दिली पाहिजे. कुठेही गर्दी करुन भाजीपाला विक्री सुरु असल्याचे किंवा भाजीबाजार भरल्याचे चित्र दिसायला नको, असे त्यांनी बजावले.
महानगरपालिका क्षेत्रात तसेच काही तालुक्यांच्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी यासाठी केली जावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आमदार सर्वश्री बबनराव पाचपुते, रोहित पवार, लहू कानडे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, , महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, पोलीस उप अधीक्षक प्रांजल सोनवणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे आदीची यावेळी उपस्थिती होती .
दरम्यान, पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी आज एमआयडीसीतील दोन्ही ऑक्सीजन निर्मिती प्लान्टला भेट दिली. त्याठिकाणी ऑक्सीजन वितरण व्यवस्था कशी आहे, दररोज किती ऑक्सीजन निर्मिती होते, काही अडचणी आहेत का, याची विचारणा करुन माहिती घेतली. पोलीस परेड मैदानावरील कोविड केअर सेंटरलाही त्यांनी भेट दिली. यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या