Ticker

6/Breaking/ticker-posts

'अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल'

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सांगली: देशात आणि राज्यात कोविड संसर्गामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करत अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लावला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे. अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल, असे महत्त्वाचे विधानही पाटील यांनी केले.


देशात आणि राज्यात कोविडमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून लक्ष हटवण्याचे केंद्रातील भाजप सरकारचे प्रयत्न चालले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे लावलेला सीबीआयचा ससेमिरा हा त्यातलाच आणखी एक प्रयत्न आहे. केंद्र सरकारने अनिल देशमुख यांच्यामागे असा ससेमिरा लावण्यापेक्षा हा वेळ जर कोविडला भारतातून बाहेर काढण्यासाठी दिला असता तर चांगली परिस्थिती देशात राहिली असती, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी निशाणा साधला. अनिल देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला एफआयआर ही मर्यादेचा भंग करून केलेली कारवाई आहे. जे सांगितलेच नाही त्याआधारवर हा एफआयआर नोंदवला गेला आहे. सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. सीबीआयचा राजकीय वापर होत आहे, अशी उघड टीकाही पाटील यांनी केली.


देशात मोघलाई आली आहे असेच आज अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईवरून स्पष्ट दिसत आहे, अशी तोफही पाटील यांनी डागली. अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करण्यासाठीच आधी एफआयआर दाखल केला असेल, असे नमूद करताना अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल, असेही पाटील म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या