Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक : दातीर हत्या प्रकरणी माजी मंत्री कर्डिले यांचे सणसनाटी आरोप नगर जिल्हयातील 'एक' मंत्री अडचणीत ?




पत्रकार दातीर हत्या प्रकरणाला वेगळेच वळण.

राहूरीतील "तो " १८ एकराचा भूखंड कोणाचा ?

माजी मंत्री कर्डिले यांनी केली चौकशीची मागणी

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची भूखंड प्रकरणातून हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूखंड प्रकरणातून झालेल्या या हत्येला पोलिस तपासाचा संदर्भ देत,तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच पत्रकार दातीर यांची हत्या झाली आहे, त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे. कर्डिले यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सरकारमधील आणखी एक मंत्र्याच्या अडचणीत भर पडणार आहे.

राहुरीतील पत्रकार दातीर यांचे दि. ६ एप्रिलला अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतले असून पोलिस तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. राहुरीचे माजी आमदार कर्डिले यांनी यासंबंधी आज (शनिवारी ) पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी खळबळजनक आरोप केले .

माजी मंत्री कर्डिले म्हणाले, पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटकही केलेली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी पत्रकार दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, अशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा समजले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेव्हूणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत. 

पत्रकार दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही. १८ एकरची मालमत्ता लाटण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल असेही कर्डिले यांनी सांगितले.

राहुरीत तनपुरे कुटुंबाची ही पद्धतच आहे. एखादी मालमत्ता बळकवायची असेल तर तेथे आधी आरक्षण टाकतात, सौदा करतात आणि नंतर आरक्षण उठवून आणतात. त्यामुळे या प्रकरणात १८ एकरशी संबंधित जे जे कोणी सहभागी असतील त्यांच्याविरुद्ध संगनमताने दातीर यांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. ही मागणी करण्यासाठी आम्ही पोलिस अधीक्षकांकडे आल्याचे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.

कर्डिले म्हणाले की,या प्रकरणातील आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. ती आम्ही पोलिसांना पुरवायला तयार आहोत. पत्रकार दातीर यांच्या पत्नीच्या जीवितालाही धोका आहे. आम्ही त्यांना भेटून आलो. त्यावेळी त्यांनी बंदोबस्त देण्याची मागणी केली. मी आमदार असल्याच्या काळात या मतदारसंघात अशा घटना घडल्या नाहीत. अलीकडे अशा चार घटना घडल्या आहेत. दातीर यांची हत्या झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. कारण त्यांना भीती आहे की भेटायला गेलो तर दातीर यांची पत्नी आपल्यावरच आरोप करेल. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा. राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढा गंभीर गुन्हा होऊ शकत नाही. यामध्ये खोट्या आरोपींना अटक न करता खऱ्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी माजी मंत्री कर्डिले यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहोत. येत्या पंधरा दिवसांत कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देत,दातीर यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या समाजाला याची माहिती आहे, मात्र आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आपण यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही कर्डिले यांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या