Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजकीय कामे थांबवा, लोकांना मदत करा- राहुल गांधीं

 

लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: करोनाच्या परिस्थितीत पश्चिम बंगालमधील प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना राजकीय कामं थांबवून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. देशभरातील पदाधिकाऱ्यांच्या मोबाइलवर गांधी यांनी हे संदेश पाठविले आहेत.

 देशभरातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांना गांधी यांनी हे संदेश व्यक्तिगत पाठविले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करोनाची परिस्थिती देशभर बिकट होत आहे. अशा परिस्थितीत लोकांना मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राजकीय कामे थांबवावीत. त्याऐवजी गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे यावे. अडचणीच्या काळात लोकांचे दु:ख दूर करणे हाच काँग्रेस परिवाराचा धर्म आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनी सर्वोतोपरी लोकांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदेशात एक संपर्क क्रमांक दिला असून ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे, त्यांनी यावर संपर्क साधावा, असे आवाहन गांधी यांनी केले आहे.

पदाधिकाऱ्यांच्या नावानिशी आलेल्या या संदेशामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. यासंबंधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व पक्षाचे राष्ट्रीय सदस्य विनायकराव देशमुख यांनी सांगितले की, करोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षातर्फे मदतकार्य सुरूच आहे. आता या संदेशामुळे आणखी उत्साह संचारला असून सर्व राजकीय कामे बाजूला ठेवून यापुढे आम्ही लोकांच्या मदतीसाठी काम करणार आहोत. खेडोपाडी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले काँग्रेसपक्ष त्याच पद्धतीने लोकांची मदत करणार असून स्वयंसेवक म्हणून अनेक कार्यकर्ते पुढे येऊ लागले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या