Ticker

6/Breaking/ticker-posts

सक्तीमुळे नगरमध्ये लसीकरण केंद्रावर उसळली गर्दी, नियमांची ऐसी- तैसी.. संसर्गाचा धोकाही वाढला..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगर:ब्रेक दि चेननावाने लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये लसीकरण आणि चाचणीच्या सक्तीच्या तरतुदी आहेत. त्यासाठी चाचणी आणि लसीकरण केंद्रावर संबंधितांची गर्दी उसळली असल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला असून संसर्गाचा धोकाही वाढला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ज्या अस्थापना आणि सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे, तेथील कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरण करून घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर संबंधितांना दंड केला जाणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी चाचणी केंद्र आणि लसीकरणासाठी नागरिकांनी धाव घेतली आहे.

आधीच या केंद्रांवर अन्य नागरिकांची तपासणी सुरू असताना त्यात ही नवीन भर पडली आहे. नगर मध्ये सरकारी रुग्णालये, सेवाभावी संस्थांमार्फत चालविण्यात येणारी केंद्र या ठिकाणी अशी गर्दी उसळल्याचे पहायला मिळाले.

संसर्ग वाढत असल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचाही चाचण्या केल्या जात आहेत. ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय झाल्याने त्यासाठीही नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. अशा परिस्थितीत सक्तीने चाचणी आणि लसीकरण करून घ्यावे लागत असलेल्यांची भर पडली आहे. त्यामुळे केंद्रांवर गर्दी झाली आहे. केंद्रांची क्षमता पहाता अनेकांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्य म्हणजे गर्दी टाळण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठीच बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे आरोग्य केंद्रावर सरकारच्या निर्णयामुळे गर्दी वाढली आहे. यातून संसर्ग पसरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही परिस्थितीत चाचणी करून घ्यायची किंवा लस घ्यायची असे ठरवून आलेले नागरिक गर्दी न करण्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत आहेत. केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या सूचनाही पाळायला कोणी तयार नसल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवा आणि अस्थापनेत काम करणाऱ्यांना दर पंधरा दिवसाला चाचणी करून घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे हा ताण पडतच राहण्याची शक्यता आहे.

निर्बंधाना व्यापारी संघटनांचा विरोध
दरम्यान, सर्वच दुकाने बंद ठेवण्यास नगरच्या व्यापारी संघटनांना विरोध दर्शविला आहे. आठवड्यातील किमान पाच दिवस सायंकाळी पाच वाजेपर्यंत का होईना दुकाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे. मात्र, सकाळपासून पोलिस आणि मनपाची पथके गस्त घालत असल्याने दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या