Ticker

6/Breaking/ticker-posts

सारोळा कासार सोसायटीवर संजय धामणे गटाचे निर्विवाद वर्चस्व ..!

 पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस गटाचा धुव्वा उडवत १३ पैकी १३ जागा जिंकल्या ..


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर – नगर तालुक्यातील सारोळा कासार सेवा सहकारी सोसायटीच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत शिक्षक नेते संजय धामणे, बाजार समिती निरीक्षक संजय काळे यांच्या लोकशाही विकास आघाडीने पंचायत समितीतील भाजपाचे गटनेते रविंद्र कडूस यांच्या ग्रामसुधार पॅनलचा ६० ते ८० मतांच्या फरकाने धुव्वा उडवत १३ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. 

सारोळा सोसायटीसाठी शनिवारी (दि.३) सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान झाले.एकूण ९३१ पैकी ८९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मतमोजणी होवून सायंकाळी उशिरा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये लोकशाही विकास आघाडीचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघात असलेल्या ८ जागांमध्ये संजय रावसाहेब काळे (४८७ मते), गोरक्षनाथ रामदास काळे (४७९ मते), जयप्रकाश भास्कर पाटील (४५८ मते), बापूराव विठ्ठल धामणे (४४५ मते), महेश एकनाथ धामणे (४४२ मते), बाळकृष्ण भिमाजी धामणे (४३४ मते), बाळासाहेब नाथा धामणे (४१३ मते), नाना धोंडिभाऊ कडूस (४१२ मते), महिला राखीव मतदार संघात मनिषा शिवाजी कडूस (४९० मते), कमल एकनाथ कडूस (४७४ मते), इतर मागासवर्ग मतदार संघातून संजय आप्पासाहेब धामणे (४७२ मते), भटक्या विमुक्त जाती मतदार संघात शिवाजी बाबुराव वाव्हळ (४७१ मते), अनुसूचित जाती मतदार संघातून चंद्रभान फकीरा जाधव (४७६ मते) हे १३ उमेदवार विजयी झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण आव्हाड यांनी काम पाहिले. तर संतोष वासकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना सोसायटीचे सचिव महादेव ठाणगे, सतीश कडूस व कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले. नगर तालुका पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

प्रतिष्ठेच्या लढतीत शिक्षक नेते संजय धामणे बाजीगर

सारोळा कासार सोसायटीच्या निवडणुकीकडे आणि विशेषतः इतर मागासवर्ग मतदार संघातील शिक्षक नेते संजय धामणे विरुद्ध पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या  प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर शिक्षकनेते संजय धामणे यांनी या लढतीत बाजी मारत रवींद्र कडूस यांचा पराभव केला. सरळ झालेल्या लढतीत संजय धामणे यांना ४७२ मते मिळाली तर रविंद्र कडूस यांना ४१२ मते मिळाली. या निवडणुकीत पूर्वी रविंद्र कडूस यांच्या सोबत असलेला संजय काळे, उपसरपंच जयप्रकाश पाटील यांचा गट संजय धामणे गटाला मिळाल्याने रवींद्र कडूस यांच्या गावातील राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या