Ticker

6/Breaking/ticker-posts

रेमडेसिवीरमागे धावू नका, खात्रीशीर उपयोग नाही : खासदार विखेंच्या बदलत्या भूमिकेची चर्चा..

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:-जिल्ह्यातील लोकांचे रेमडेसिवीर इंजेक्शनअभावी होणारे हाल पाहू शकत नाही, त्यामुळे दिल्लीत जाऊन ही इंजेक्शन आणली, असे सांगणारे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आता या इंजेक्शनच्या परिणामकारतेबद्दलच शंका व्यक्त केली. याचा खात्रीशीर उपयोग होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यासाठी धावाधाव करून नये, असा सल्लाही डॉ. विखे यांनी दिला. डॉ. विखे यांनी रविवारी पारनेर तालुक्यात विविध कोविड केअर सेंटरला भेटी देत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रेमडेसिवीरबद्दलचे आपले मत व्यक्त केले.


डॉ. विखे म्हणाले, ‘ज्या रेमडेसिवीरसाठी लोक धावाधाव करीत आहेत, ते करोनावरील रामबाण उपाय नाही. रुग्णांचे नातेवाईक जेवढी धावपळ करतील तेवढा त्याचा काळाबाजार केला जाईल, आर्थिक लुटमार होईल. डॉक्टर या नात्याने जबाबदारीने सांगतो की, आमच्या विळद घाट येथील हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शनचे वेगवेगळे अनुभव नोंदले गेले आहेत. २२ ते ३० वयोगटातील अनेक रुग्णांना या इंजेक्शनचे सहा डोस देऊनही त्यांचा मृत्यू झाला आहे. याउलट एकही इंजेक्शन न देता साठ वर्षांवरील अनेक रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे करोनावर नेमकी उपचार पद्धती नाही, नेमके कोणते औषध काम करते, याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांनी मनातील चिंता काढून टाकावी. रेमडेसिवीर मिळाले नाही म्हणून आपला रुग्ण दगावेल ही भीती मनातून काढून टाकावी. गंभीर रुग्णांना खरी गरज आहे ती ऑक्सिजनची. आपल्या जिल्ह्यात आता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत आहे. ज्या काही त्रुटी आहेत, त्या दूर केल्या जातील,’ असे डॉ. विखे यांनी सांगितले.


गेल्या आठवड्यात डॉ. विखे यांनी दिल्लीहून खासगी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणली होती. त्याचा एक व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला होता. यामध्ये कोणत्या पक्षाचा संबंध नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांचे हाल पाहू शकत नसल्याने ही इंजेक्शन आणल्याचे ते म्हणाले होते. अत्यंत गोपनीय पद्धतीने त्यांनी ही मोहीम राबवून ती यशस्वी झाल्यानंतरच काही दिवसांनी हा व्हिडिओ प्रसारित केला होता. आपल्या जिल्ह्यात रेमडेसिव्हिरसाठी स्वत:च एवढी धडपड केलेल्या डॉ. विखे यांनी आता रुग्णांच्या नातेवाईकांना त्यासाठी धावाधाव न करण्याचे आवाहन केल्याने त्यांच्या बदलत्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या