Ticker

6/Breaking/ticker-posts

अॅम्ब्युलन्स आली सायरन वाजवत सुस्साट.., पाहणी केल्यावर आतमध्ये रुग्ण नव्हे, निघाले ‘’देशीप्रेमींचे’’ घबाड..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

संगमनेर:-संगमनेरमध्ये नाकाबंदी सुरू असताना एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. आतमध्ये रुग्ण नसतानाही सायरन वाजवत निघालेल्या रुग्णवाहिकेला पोलिसांनी थांबवले. रुग्ण नसताना सायरन का वाजवितो, अशी पोलिसांनी विचारणा केल्यावर चालकाची भंबेरी उडाली. शंका आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता, रुग्णवाहिकेतून देशी दारूची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.

सरकारने संचारबंदीचे नियम काल रात्रीपासून अधिक कठोर केले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. संगमनेरतालुक्यात तर रुग्णवाहिकेची चोरी होण्याची घटना अलीकडेच घडली होती. त्यामुळे पोलीस सर्वच वाहनांबद्दल अधिक सतर्क आहेत. शुक्रवारी शहरातील बस स्थानकाजवळ नाकाबंदी सुरू होती. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आपल्या पथकासह तेथे तपासणी करीत होते. त्यावेळी एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. मात्र त्यामध्ये रुग्ण दिसत नव्हता. तरीही सायरन का वाजवतो? अशी विचारणा पोलीस निरीक्षक देशमुख यांनी चालकाकडे केली. त्यावर त्याची चांगलीच भंबेरी उडाली.

 

पोलिसांना शंका आल्याने त्यांनी रुग्णवाहिकेची दरवाजा उघडून तपासणी सुरू केली. तर आतमध्ये देशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करून चालकासह त्याच्या साथीदाराला अटक केली.
या रुग्णवाहिकेचा चालक विजय खंडू फड (वय ४२, रा. संगमनेर) व साथीदार कैलास छबुराव नागरे (रा. शेडगाव) याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच बॉक्स देशी दारू आणि रुग्णवाहिका असा सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सध्या करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांची मागणी वाढलेली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांकडून जादा पैसे आकारून रुग्णवाहिका दिल्या जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत. तर दुसरीकडे निर्बंध आणखी कठोर केल्याने अधिकृत दारू वाहतूक आणि विक्रीला मर्यादा आल्या आहेत. त्याचा गैरफायदा उठवत पोलिसांची नजर चुकविण्यासाठी रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक करण्याचा हा प्रकार असल्याचे आढळून आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या