लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
संगमनेर: 'करोना हे संपूर्ण मानव
जातीवरील संकट आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कटू निर्णय घेतल्याशिवाय पर्याय
नाही. मागीलवेळी कडक लॉकडाउन करण्यात आल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले
होते. त्यामुळे त्यांचा यासाठी विरोध सहाजिकच असला तरीही मानवतेवरील हे संकट
सर्वांनी लक्षात घेऊन सरकारला सहकार्य केले पाहिजे,' अशा
शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी राज्यात कडक लॉकडाउन लावला जाण्याचे संकते दिले.
थोरात यांनी शनिवारी सकाळी संगमनेर येथे
करोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री
विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन करण्याचे संकेत दिले
होते. त्यानंतर आता थोरात यांनीही हाच उपाय बोलून दाखविला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी
चर्चा केल्याचा संदर्भ देत थोरात म्हणाले,
'मानव जातीवरील संकटाच्या काळात सर्वपक्षीय मतभेद विसरून सर्वांना
एकत्र यावेच लागेल. मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांशी यासंबंधी
चर्चा केली. त्यांनी सर्वांनी यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार आता राज्यात
योग्य ते निर्णय घेतले जातील. प्रसंगी कटू निर्णय घेण्याची वेळ आली तरी ते घेतले
जातील. देशासह राज्यात आलेल्या या संकटाच्या काळातही काही मंडळी राजकारण करण्याचा
दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत. वास्तविक पहाता अशावेळी सर्वांनी एकत्र येणे गरजे
आहे. विरोधी पक्षांसह जनतेच्याही सहकार्याची सरकारला गरज आहे. जगातील उदाहरणे
पाहता दुसरी लाट अधिक धोकादायक ठरल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्याला दक्षता
घ्यावीच लागेल, असं थोरात म्हणाले आहेत.
' मागील वर्षीच्या लॉकडाउनमुळे
व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातावर पोट असणाऱ्यांचेही हाल झाले. मात्र,
सध्याची परिस्थिती अवघड आहे. हे मानवतेवरील संकट असून त्याला
सर्वांनी मिळून सामोरे जाण्याची गरज आहे. त्यामुळे काही निर्णय खंबीर आणि भक्कमपणे
घ्यावे लागणार आहेत. या काळात औषधांची साठेबाजी आणि गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली
जाणार नाही. दुसऱ्या लाटेत मृत्यू वाढत आहेत, हे खरे असले
तरी हे चित्र केवळ नगरमधील नाही. सर्वत्र हे प्रमाण वाढले आहे, असंही ते म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील
यांनी कालच थोरात यांच्यासह जिल्ह्यातील अन्य मंत्री आणि पालकमंत्र्यांवर टीका
केली होती. पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात आता आणि जातात, तर जिल्ह्यातील तिन्ही मंत्री कोठेच
दिसत नाही, अशी टीका विखे यांनी केली होती. त्यांना उत्तर
देताना थोरात म्हणाले, 'त्यांच्या टीकेला फार महत्व देण्याची
गरज नाही. त्यांना नियतीने दिलेली विरोधपक्षाची भूमिका ते बजावत आहेत. स्वत:
मुख्यमंत्री आणि आम्ही इतर मंत्री राज्यभरात परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ते
निर्णय घेत आहोत. करोनाचा संसर्ग थांबविणे आणि नवीन संसर्ग होऊ न देणे हे सरकारचे
मुख्य ध्येय आहे,' असेही थोरात म्हणाले.
0 टिप्पण्या