Ticker

6/Breaking/ticker-posts

मोठी बातमी : कोरोना वाढला; औरंगाबादमध्ये सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन ?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून पुढील आठवड्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हे लॉकडाऊन दहा दिवसांचे असेल, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सोमवार ते बुधवार दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून हे लॉकडाऊन १८ किंवा २० मार्चपर्यंत लागू असेल.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. पाच दिवसांपासून तर रोज तीनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनासमोर रुग्ण वाढ रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बाजारपेठेतील गर्दी,कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करण्यात होत असलेले दुर्लक्ष या बाबी रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरू लागल्या आहेत. मास्कचा वापर करा असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असतानाही अनेक नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाने ७ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या नंतर देखील रुग्णवाढीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

रुग्ण संख्येचा वाढता आलेख लक्षात घेता पत्रकारांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना लॉकडाऊन बद्दल विचारले असता त्यांनी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, असे सांगितले होते. सलग आठ दिवस रोज तीनशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले होते. ज्या भागात जास्त रुग्ण किंवा ज्या भागात जास्त गर्दी, त्या भागात लॉकडाऊन लावू, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, शनिवारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढील आठवड्यापासून दहा दिवसांसाठी संपूर्ण औरंगाबाद शहरात लॉकडाऊन पुकारण्यात येणार असल्याचे सांगितले. लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासक यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन कोणत्या दिवसापासून लागू करायचा याचा निर्णय होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ते १० मार्चच्या दरम्यान प्रशासन लॉकडाऊन लावू शकते. १८ किंवा २० मार्च पर्यंत हे लॉकडाऊन असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या