Ticker

6/Breaking/ticker-posts

‘बिजलीमल्ल’ माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सांगली :  : प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्ती सुरू होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच  धोबीपछाड देण्याची खासियत असणारे बिजलीमल्ल म्हणून ओळख असणारे माजी आमदार संभाजी पवार यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संभाजी पवार 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सक्रिय राजकारणापासून दूर झाले होते. काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यावर राजकीय पैलवान-संभाजी पवार हे पुस्तक प्रकाशित झाले होते. गेले काही वर्षे ते पार्किन्सनच्या जुनाट आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती.

वज्रदेही मल्लहरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. मात्र एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले आणि स्व. वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णू अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली होती. 

शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती.  20 09  साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.

2014  साली पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीयदृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते आपली मते मांडत होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. 12  वाजता त्याच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. 1 वाजता  मारुती चौकात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या