Ticker

6/Breaking/ticker-posts

अन्न व औषध प्रशासनाची नगरमधील प्रसिद्ध हॉटेलवर मोठी कारवाई

 


लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अहमदनगर: किचनमध्ये झुरळांचा वावर, काही मशीनरीमध्येही झुरळ मरून पडलेली, किचनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झालेली. सुधारण्याची संधी देऊनही सुधारणा केली नाही, अशा अवस्थेत नगर शहरातील हॉटेल औरस (हॉटेल कपिराज) चा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. २६ एप्रिल ते २ मे २०२१ या काळात संबंधितांना हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.


अन्न व औषध प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यात हॉटेलची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. ३० डिसेंबर रोजी नगर शहरातील मनमाड रोडवरील हॉटेल औरस (हॉटेल कपिराज) तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.पी. शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही तपासणी केली होती. या हॉटेलमध्ये तपासणीवेळी अनेक गंभीर त्रुटी आढळुन आल्या. प्रामुख्याने किचनमध्ये झुरळांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून आला. काही मशीनरीमध्ये झुरळ मरून पडल्याचे आढळून आले. किचनमध्ये मोठया प्रमाणात अस्वच्छता आढळली. कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झाल्याचे आढळले. बारमध्ये मॉकटेल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळया फ्लेवरचे क्रश मुदतबाहय झाल्याचे आढळून आले. 

हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे ब्रेड व इतर बेकरी पदार्थ यांच्यावर कोणत्याही प्रकारचे लेबलवर्णन नव्हते. हॉटेलमध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल न करणे, गोदामामधील अन्नपदार्थ अस्ताव्यस्त ठेवणे, मुदतबाह्य अन्नपदार्थाचा साठा, किचनमधील फ्रिज व डीप फ्रिजरमध्ये अन्नपदार्थ अस्ताव्यस्तपणे साठविणे, साठविलेल्या तयार अन्नपदार्थावर कोणत्याही प्रकारचे लेबल नसणे, कामगारांची अस्वच्छता अनेक असे दोष आढळून आले. त्यामुळे व्यवस्थापनाला ६ जानेवारी २०२१ रोजी सुधारण्याची नोटीस देण्यात आली.

नोटिशीच्या मुदतीत हॉटेलकडून कोणताही खुलासा आला नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीला पुन्हा तपासणी करण्यात आली. तेव्हा पूर्वी आढळून आलेल्या ३४ मुद्द्यांपैकी केवळ सहा मुद्द्यांची पूर्तता करण्यात आल्याचे आढळून आले. त्यावर सुनावणी ठेवण्यात आले. त्यासाठी २५ फेबुवारी तारीख देण्यात आळी. मात्र त्यावेळीही हॉटेल व्यवस्थापनाकडून समाधानकार खुलासा सादर करण्यात आला नाही. त्यामुळे हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २६ एप्रिल ते २ मे या सात दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करु नये, असा आदेश व्यवस्थापनाला देण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त शिंदे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या