Ticker

6/Breaking/ticker-posts

‘त्या’ पत्राबाबत परमबीर सिंह यांचा मोठा खुलासा; म्हणाले..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या या पत्रामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या मुख्यमंत्री कार्यालयाकडून या पत्राबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले असून पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतानाच परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.

परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ई-मेलवर आज दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ई-मेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं होतं. त्यामुळं परमबीर सिंह यांच्या या पत्रावर शंका उपस्थित करण्यात येत होती. आता परमबीर सिंह यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

परमबीर सिंह यांच्यांशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलणं टाळलं. मात्र, मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र आपणच लिहलं असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. तसंच, लवकरच स्वाक्षरी असलेल्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, पत्रात आपण सर्व नमूद केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
परमबीर यांच्या लेटरबॉम्बने खळबळ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्फोटक पत्र आज समोर आल्याने राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्र पोलीस दलात भूकंप झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले. देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, यासह अनेक गंभीर आरोप परमबीर यांनी या पत्रात केले. त्यानंतर देशमुख यांनी परमबीर यांचे सर्व आरोप फेटाळत हे षडयंत्र असल्याचा दावा केला व याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी स्वत: मुख्यमंत्र्यांना विनंती केली. या सर्व घटनाक्रमात जे पत्र व्हायरल झाले त्यावर परमबीर यांची स्वाक्षरीच नसल्याचे समोर आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिलेले असले तरी परमबीर सिंग यांची मात्र अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या