Ticker

6/Breaking/ticker-posts

वाचन चळवळ वाढविण्याची नितांत गरज- सुनील गोसावी

 राजभाषा मराठी दिन व्याख्यानमाला  पुष्प तिसरे

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर- : -जग आधुनिक जरी होत असले तरी,आधुनिक तंत्रज्ञान अतिप्रगत होत असले तरी मानवी मनाचा विस्तार, जाणिवा, नेणिवा वृद्धिंगत होण्याकरिता ग्रंथांची ,पुस्तकांची ,ग्रंथालयांची आधुनिक होत जाणार्‍या माणसाला नितांत गरज आहे. यातून वाचन चळवळी वाढण्याची नितांत गरज समस्त जगासाठी निर्माण झाली आहे .यातूनच मराठी भाषा अधिक समृद्ध व सशक्त होणार आहे, असे प्रतिपादन शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी यांनी केले

ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या माध्यमातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी राजभाषा गौरव ऑनलाइन व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना श्री गोसावी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालयअधिकारी श्री अशोक गाडेकर उपस्थित होते. ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. 

स्वागत प्रास्ताविकातून श्री.गाडेकर यांनी नमूद केले की व्याख्यानमालेच्या माध्यमातून मराठी बद्दलचा विचार अधिकच सशक्त करण्याची कार्यालयाची भूमिका आहे. एखादे साधेसे पुस्तक जीवनामध्ये परिवर्तन घडवते. त्याचे मुखपृष्ठ -मलपृष्ठ किती भारी कागदाचे आहे किंवा त्याची किंमत किती मोठी आहे हे महत्त्वाचे नसून त्यातील विचार एखाद्या ग्रहावरचे सामाजिक परिवर्तन घडवतात ही क्रांतिकारी गोष्ट ठरते. हाच विचार देण्याचे काम व्याख्यानमाला करत आहे.

     सुनील गोसावी यांनी व्याख्यानवजा मुलाखतीतून शब्दगंध हे नाव कसे सुचले येथपासून तर शब्दगंध साहित्य परिषदेचे निर्मिती ,उपक्रम, साहित्यसंमेलने, वेगळेपण, शब्दगंध प्रकाशनाची माहिती ,पुस्तके, काव्यसंग्रह ,कथासंग्रह बरोबरच विविध पुरस्कार तसेच कवी संमेलनाची माहिती याबरोबरच शब्दगंध साहित्य परिषदेच्या भविष्यातील योजना आदी विविध मुद्द्यांवर दिलखुलास विवेचन केले व शब्दगंधचा प्रवास मांडला.  शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास शब्दगंध प्रकाशनाच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. डॉ अमोल बागुल यांनी मुलाखत घेतली.कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी हनुमंत ढाकणे यांनी आभार मानले. सोशल मीडियाच्या विविध अॅपवर ही मुलाखत उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या