Ticker

6/Breaking/ticker-posts

सक्खे मित्र, झाले पक्के वैरी..

 

एकाच म्हणणं कोरोना गेला की या विषयावर आपण बसू

तर दुसर्‍याच “ असंगाशी संग मी करत नाही.


 

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 बारामती : एके काळचे जिवाला जीव देणारे जिवलग मित्र ते आता कट्टर राजकीय वैरी ... असा काहीसा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांचा प्रवास आहे. त्यांच्यातील राजकीय वैरत्व कमी झालं नसल्याचं आज एका घटनेतून दिसून आलं. हे दोन नेते समोरासमोर आले मात्र त्यांनी एकमेकांकडं ढुंकूनही पाहिलं नाही.

महाराष्ट्रात आघाडीचं सरकार असताना 2012 साली राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांनी उस दर आंदोलनावरुन राज्य सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं. या दोघांनी थेट देशाचे तत्कालीन कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांच्या बारामतीत आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनावेळी या दोघांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता.

मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर स्वाभिमानाच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदी सदाभाऊंची वर्णी लागली. पण त्यांची भाजपशी वाढणारी जवळीक कार्यकर्त्यांना रुचली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आणि सदाभाऊंनी भाजपशी सोयरीक जमवली. त्यानंतरही बरंच राजकारण झालं आणि सदाभाऊंची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाली. त्यांनीही आपला स्वत:चा पक्ष काढला. आता कोणत्या ना कोणत्या कारणातून या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळते.

उसदरासाठी 2012 साली केलेल्या आंदोलनाचा खटला अजूनही बारामती कोर्टात सुरु आहे. दोघांवरही केस सुरु असताना, त्यासाठी हे दोन नेते एकाच ठिकाणी येणार होते. पत्रकारांनी सदाभाऊंना राजू शेट्टी यांना भेटणार का असा प्रश्न विचारल्यावर सदाभाऊ खोत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, "राजू शेट्टी त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी आहेत. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. आपण सर्वांच्याच हातात हात देत असतो. पण कोरोनामुळे त्याला बंधने आलीत. आता एकमेकांना मिठी मारणं बंद झालंय. एकदा का कोरोना गेला की या विषयावर आपण बसू."

सदाभाऊंनी हे वक्तव्य काहीच वेळापूर्वी केलं होतं. नंतर बारामती कोर्टाच्या आवारात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकमेकांसमोर आले पण त्यांनी एकमेकांकडं बघितलंही नाही. राजू शेट्टी न्यायालयातून बाहेर पडत होते तर सदाभाऊ खोत न्यायालयात प्रवेश करत होते. पत्रकारांनी सदाभाऊंनी केलेल्या वक्तव्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर असंगाशी संग मी करत नाही एवढंच राजू शेट्टी म्हणाले. सदाभाऊंनी वापरलेला 'बसू' या शब्दाचा अर्थ वेगळा होत असल्याचंही ते म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या