Ticker

6/Breaking/ticker-posts

'बर्ड फ्लू' नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी

 


अहमदनगर :- जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूची नोंद झाली नसली तरी राज्यात इतर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या घ़टना आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने प्रतिसाद आणि प्रतिबंधासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ७८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता पोल्ट्री व्यवसाय अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच पोल्ट्री चालकांनीही पोल्ट्री फार्मसमघील एखादा पक्षी मृत्यूमुखी पडला तर तात्काळ त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.

     राज्यातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या काही घटना निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंदर्भात आज पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली. उपवन संरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंभारे, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी.एन. शेळके, पशुसंर्वचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव  या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील एकूण पशुधन, कुकुटपक्ष्यांची संख्या, जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मसची संख्या आदींबाबत आढावा घेतला.

*जिल्ह्यात अद्याप 'बर्ड फ्लू'ची नोंद नाही*  * जिल्ह्यात ७८ पथकांची स्थापना*

जिल्ह्यात अद्यापपर्यंत बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची नोंद नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या ७८ पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत. सध्या जिल्हयात ३ हजार ३४१ पोल्ट्री फार्मस असून त्यात १ कोटी १४ लाख पक्षी आहेत. पाथर्डी तालुक्यात एका पोल्ट्री फार्ममधील ५० कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला असला तरी, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप या पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा अहवाल आलेला नाही. मात्र, पोल्ट्रीचालकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाला तर तात्काळ पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी. तपासणी झाल्यानंतर पक्ष्यांची योग्य ती विल्हेवाट लावणे महत्वाचे आहे. संबधित पोल्ट्रीफार्मसची स्वच्छता खूप महत्वाची आहे. मृत्यू झालेले पक्षी खोल खड्डा घेऊन त्यात पुरणे आवश्यक आहे. जेणेकरुन पक्ष्यांचा अहवाल बर्ड फ्ल्यूचा आला तर त्याचा प्रसार रोखला जाईल, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

*राज्यातील 'बर्ड फ्ल्यू'च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क*

दरम्यान, बर्ड फ्ल्‍यू प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी  राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचेही पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अचानक मोठ्या प्रमाणावर उद्भवणारी पक्षांची मर्तुक त्‍वरीत वरिष्‍ठ कार्यालयास / आयुक्‍तालयास कळवावी. क्षेत्रीय स्‍तरावरील अधिकार्‍यांनी त्याबाबत दक्ष राहावे. सर्व शेतकरी / पशुपालकांनी बर्ड फ्ल्‍यू रोगाची लक्षणे पक्ष्यांमध्ये आढळल्‍यास नजिकच्‍या पशुवैद्यकिय दवाखान्‍याशी संपर्क साधावा. पशुवैद्यकिय कर्मचार्‍यांनी रोजच्या तसेच आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबवावी. संशयीत क्षेत्रावरून पक्षांची वाहतुक / ने आण पूर्णपणे बंद करावी. उघड्या कत्‍तलखान्‍यात जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी, रोजची स्‍वच्‍छता व निर्जंतुकीकरण करावे. अशा कत्‍तलखान्‍यातुन पक्षी परत येणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. या रोगाचे जंतू इतर प्राण्यांमध्येसंक्रमीत होणार नाहीत अशा प्रकारची जैवसुरक्षा यंत्रणा असणे अत्‍यावयश्‍क आहे. रोग प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने लागणारे साहित्‍य, उपकरणे, रसायने आदीबाबत पूर्वतयारी ठेवावी. मास्‍क, निर्जंतुके, रसायने आदींची उपलब्‍धता करुन ठेवणे व अशा वस्‍तुंच्‍या उपलब्‍धतेसंबंधी आवयश्‍क बाबींची पुर्तता करुन ठेवणे. तसेच या वस्‍तु आवयश्‍क वेळी अविरतपणे कशा उपलब्‍ध होतील या विषयीची माहिती कायमपणे ठेवण्‍यात यावी. सन 2015 च्‍या सर्वेलन्‍स प्‍लॅननुसार व्‍यापक बर्ड फ्ल्‍यू सर्वेक्षण मोहीम सुरू ठेवावी. या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत अधिकची माहिती (www.dahd.nic.in) या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. जेथे पोल्‍ट्री फार्मस आहेत तेथे आवश्‍यकतेनुसार याबाबतची कार्यवाही करावी. फक्‍त शासकीय नव्‍हे तर खाजगी पोल्‍ट्री फार्मसवरसुध्‍दा याबाबत खबरदारी घेणे आवयश्यक आहे. प्रत्‍येक गावांतील ग्रामपंचायतीने धुण्‍याचा सोडा (Na2CO3 सोडियम कार्बोनेट) यांचे 1 लिटर पाण्‍यामध्‍ये 7 ग्राम याप्रमाणे द्रावण तयार करुन कोंबड्यांची खुराडे, गुरांचे गोठे, गावांतील गटारे, नाल्‍या, पशुपक्ष्‍यांचा वापर असलेल्‍या भिंती व जमिनीवर तात्‍काळ फवारणी करावी. पुन्हा दर 15 दिवसाच्‍या अंतराने 3 वेळेस फवारणी करावी. यामुळे विषाणू, जिवाणू, माश्‍या, गोचीड आदींचा प्रादुर्भाव रोखणे शक्‍य होईल. सर्वेक्षणासाठीचे रोगनमुने नियमितपणे प्रयोगशाळेस पाठवावेत. बाहेरून येणारे अर्थात स्थलांतरित (पाहुणे) पक्षी यांचा बर्ड फ्ल्‍यू रोगाच्‍या प्रसारामध्‍ये महत्‍वाची भुमिका बजावत असल्‍याने ते ज्‍या भागात भेट देतात त्‍या भागामध्‍ये व्‍यापक, नियमित व वारंवार सर्वेक्षण मोहिमा राबवावी, अशा मार्गदर्शक सूचनांची तात्काळ अंमलबजाणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या