अहमदनगर :- लालटाकी परिसरातील पंडित नेहरूंचा पुतळा अखेर सोमवारी अतिक्रमण मुक्त झाला. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने नेहरू पुतळ्यासमोरील रस्त्यावर उभारण्यात आलेले जाहिरातीचे होर्डिंग्ज मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढले. तातडीने झालेल्या या कार्यवाहीचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी स्वागत केले.
नेहरूंच्या पुतळ्यासमोरील जाहिरात होर्डिंग्ज हटवले नाही तर बुलडोझरने ते तोडण्याचा इशारा काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष काळे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी मनपा आयुक्त-जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या दालनात बैठक झाली व त्यातील निर्णयानुसार मनपाच्या पथकाने तातडीने संबंधित होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई सुरू केली. यामुळे पंडित नेहरूंचा पुतळा आता अप्पू हत्ती चौकातूनही दिसू लागला आहे.
डॉ. भोसले यांच्या रूपाने मनपाला कार्यक्षम आयुक्त लाभले आहेत. त्यांची धडाकेबाज निर्णय घेण्याची पद्धत पाहता नगर शहराच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडेच प्रभारी आयुक्तपदाचा चार्ज पुढील तीन वर्षांसाठी राहावा, अशी भावना यावेळी काळे यांनी व्यक्त केली. दरम्य़ान, जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यामुळे मनपाने कारवाई करीत सर्व होर्डिंग्ज उतरवले. त्याचबरोबर नेहरू पुतळा परिसराला लागून असणारी अतिक्रमणे देखील हटविली. सोमवारी सकाळीच मनपाच्या साफसफाई कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छतेसाठी धावाधाव केली होती.
बैठकीपूर्वीच मनपाची कारवाई
या बैठकीत काय होते व काँग्रेस भूमिका घेते याबाबत उत्सुकता होती. पण बैठक संपण्यापूर्वीच मनपाने कारवाई करत नेहरू पुतळ्याचा श्वास मोकळा केला. यामुळे पुन्हा एकदा नेहरू पुतळा व परिसरातील विस्तीर्ण झाडे दिसू लागली आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत बैठकीतच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पक्षाच्यावतीने डॉ. भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांना पंडित नेहरू यांनी भुईकोट किल्ल्यामध्ये वास्तव्यास असताना लिहिलेले डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक भेट देऊन सत्कार केला. नागोरी ट्रस्टनेही सामंजस्याची भूमिका घेत सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही काँग्रेसने आभार मानले.
0 टिप्पण्या