Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ दि बर्निंग फॉरेस्ट ‘ तळेगाव दिघेनजीक जंगलास आग..

 

लोकनेता न्यूज  ऑनलाईन

संगमनेर :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक चिंचोली रस्त्याच्याकडेला असलेल्या जंगलास गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून बेचिराख झाली. सुमारे पाच एकर क्षेत्रातील नवीन लागवड केलेले जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबने पाणी मारून आग विझविली मात्र तोपर्यंत हजारो वृक्ष जळून बेचिराख झाले होते.
           तळेगाव दिघे गावाच्या पश्चिमेला गायरान क्षेत्रात सुमारे पाच एकरहून अधिक क्षेत्रात वनविभागामार्फत विविध वृक्ष रोपांची लागवड करण्यात आलेली होती. यंदा पाऊस चांगला झाल्याने वृक्षरोपे बहरू लागली होती. दरम्यान गुरुवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास जंगलास अचानक आग लागली. वाळलेल्या गवतामुळे आगीने जोरात पेट घेतला. थोड्याच वेळात आगीने जंगलाचा मोठा परिसर व्यापला.

          याबाबत माहिती मिळताच सरपंच बाबासाहेब कांदळकर, युवक कार्यकर्ते मतीन शेख, अमोल दिघे, अनिल दिघे सहित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. स्थानिकांनी संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेस याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने थोरात साखर कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक बंबने पाण्याचे जोराचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. या जंगलास आग कशामुळे लागली याचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. या लागलेल्या आगीत सुमारे पाच एकर क्षेत्रात लागवड करण्यात आलेले हजारो वृक्ष बेचिराख झाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या