Ticker

6/Breaking/ticker-posts

आ. रोहित पवारांचा पाठपुरावा : पोटखरबाची 'लागवडीयोग्य क्षेत्र' अशी होणार नोंद.

 


मार्च अखेरीस होणार शेतकऱ्यांच्या सातबारात बदल

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

जामखेड:-सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद ही 'पोटखराब क्षेत्र' अशी असल्याने हजारो शेतकऱ्यांना पीककर्ज,पीकविमा,नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई तसेच शासनाच्या अनेक योजनांपासुन वंचित राहावे लागत होते.

    शासनाचा शेतसाराही बुडत होता, मात्र येत्या मार्च अखेरीस जिल्ह्यातील पोटखराब जमीनीची शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर 'लागवडी योग्य क्षेत्र' अशी नोंद होणार आहे. राष्ट्रवादीचे युवा आ.रोहित पवार मतदारसंघात फिरत असताना शेतकऱ्यांनी हा प्रश्न मांडला होता. शेतकऱ्यांच्या पिकाऊ शेतीच्या क्षेत्रात वाढ व्हावी,त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार हे जिल्हाधिकाऱ्यांशी वेळोवेळी पाठपुरावा करत होते. आता त्यांचा हा पाठपुरावा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे.महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे देखील या पोटखराब क्षेत्राच्या प्रश्नाकडे लक्ष होते. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या जवळील आर्थिक पदरमोड करून पोटखराब असलेल्या क्षेत्रामध्ये सुधारणा करून ते क्षेत्र लागवडीखाली आणले खरे,पण या पोटखराब क्षेत्राची नोंद ही वर्षानुवर्षे सातबारा उताऱ्यावर 'पोटखराब क्षेत्र' अशीच आहे. याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसत आला आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना आणि कर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता.

           जिल्हाधिकाऱ्यांनी आता याबाबत नवीन आदेश पारीत करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांनी पोटखराब क्षेत्राबाबत कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी असे पोटखराब क्षेत्र लागवडी योग्य केले आहे. अशा शेतकऱ्यांनी स्थानिक तालाठ्याकडे अर्ज करावयाचा आहे. पोटखराब क्षेत्राच्या पिकपाण्याचा सर्व्हे तेथील स्थानिक तलाठी व भुमी अभिलेख विभाग करणार असुन याबाबत अंतिम निर्णय उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी हे घेणार आहेत.उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून अधिक काटेकोरपणे या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करून त्याबाबतचे अहवाल हे वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करायचे आहेत. मार्चच्या अखेरीसच या पोटखराब जमिनीचा महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत 'लागवडी योग्य क्षेत्रा'त सामावेश करण्यात येणार आहे. तशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय महसुल यंत्रणेला दिल्या आहेत..

       मतदारसंघातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न समजुन घेत असताना आ.रोहित पवारांनी रखडलेल्या विम्याचा प्रश्न हाती घेतला आणि संपुर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे तब्बल १९० कोटी रु.मिळवून दिले.आता पोटखराब क्षेत्रात बदल होऊन त्या क्षेत्राची 'लागवडी योग्य' अशी नोंद होऊन याचा फायदा संपुर्ण संपुर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या