Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक निवडणूक :- आ. नीलेश लंके, उदय शेळके, जयश्री औटी, सुप्रिया झावरे यांचे अर्ज दाखल

 

पारनेर :- पारनेर- नगर मतदार संघाचे आमदार नीलेश लंके, विद्यमान संचालक उदय शेळके यांनी शुक्रवारी दुपारी सेवा संस्था मतदार संघातून जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल केले.पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या सुप्रिया यांनी महिला प्रतिनिधी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले.बिगरशेती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सबाजी गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी अर्ज दाखल केला आहे.इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे पारनेर तालुक्यात सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची चिन्हे आहेत.

     जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सेवा संस्था मतदार संघातून आमदार नीलेश लंके निवडणूक लढवतील असा दावा आमदार लंकेे यांच्या निकटवर्तीयांकडून बँकेची निवडणूक जाहिर झाल्यानंतर केला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसची सहकार क्षेत्रावर मोठी पकड असून राष्ट्रवादी पक्षात पवार कुटूंबियांजवळ गेलेले आमदार लंके सहकारात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरतील असा होरा वर्तवण्यात आला होता.  विद्यमान संचालक उदय शेळके यांच्यावर महानगर बँकेच्या व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी आहे त्यामुळे ते या निवडणुकीत उतरणार नाहीत असा अंदाजही वर्तवण्यात आला होता. मात्र शेळके यांनी आपला अर्ज दाखल केला असून ते अर्ज ठेवणार किंवा नाही याबाबत माहीती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. आमदार लंके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उदय शेळके हे उपस्थित होते.त्यामुळे उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल.

     दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विजय औटी यांना सहकारी बँक निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आमदार लंके यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल करून पुढील हालचालींना सुरूवात केली आहे. या निवडणूकीत पारनेर मतदारसंघात एकूण १०५ मतदार असून ६० ते ६२मतदार आमदार लंके यांच्या पाठीशी उभे असल्याचा दावा आमदार लंके यांंचे निकटवर्तीय वकील राहुल झावरे केला.त्यापेक्षाही जास्त मतदान घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे झावरे यांनी स्पष्ट केले.

     आमदार लंके आणि बँकेचे विद्यमान संचालक उदय शेळके यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, राहुल झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, बबनराव गंंधाक्ते, अरूण पवार, भाऊसाहेब भोगाडे, सचिन गवारे, अण्णा बढे, प्रभाकर कवाद, लहू थोरात, राजेश शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

      मिळालेल्या माहीतीनुसार माजी आमदार विजय औटी जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यास उत्सुक असून महाआघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जागा वाटपात पारनेर सेवा संस्था मतदार संघाची जागा न मिळाल्यास महिला प्रतिनिधी म्हणून पत्नी जयश्री औटी यांची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजपाच्या वतीने उमेदवारी मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याअनुषंगाने सुप्रिया झावरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या