Ticker

6/Breaking/ticker-posts

मंत्रालयात खळबळ ! मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार, गुन्हा दाखल

 मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या   एका महत्त्वाच्या फाईल मध्ये फेरफार  करत मुख्यमंत्र्यांचा आदेश फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभित्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. संबंधित फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर त्या फाईलमधील मजकूरच बदलण्यात आला

टाईम्स  ऑफ इंडियाच्या  या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभियंत्याच्या चौकशीचे आदेश देणारा मजकूर असलेल्या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर स्वाक्षरीच्या वरच्या भागात लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहण्यात आला. त्यामध्ये चक्क त्या अभियंत्याची चौकशी बंद करावी, असा शेरा लिहिण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामात झाली होती अनियमितता
हे प्रकरण शिवसेना-भाजप युतीच्या सरकारच्या काळातील आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामात अनियमितता झाल्याचे उघड झाले होते. त्यावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये फेरफार करण्यात आलेल्या फाईलमधील अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार हे कार्यकारी अभियंता पदावर काम करत होते.

अशोक चव्हाण यांना आला संशय
महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते अशोक चव्हाण यांच्याकडे आले. चव्हाण यांनी चौकशीची ही फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली होती. मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर ही फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परत आली. मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला असताना फाईलवर मात्र मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना धक्का बसला. यात मुख्यमंत्र्यांनी इतर अभियंत्यांच्या चौकशीचे आदेश कायम राखत नाना पवार यांचे नाव वगळल्याचे फाईलवर दिसत होते.

फाईलची तपासणी केली गेली अन  ...
मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत हा शेरा कोंबून लिहला होता. खरे तर मुख्यमंत्री सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडतात, असे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्याने सांगितले. याच कारणामुळे अशोक चव्हाण यांच्या मनात शेऱ्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यानंतर यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. मात्र, फाईलची मूळ प्रत तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा मुख्यमंत्र्यांनी लिहलेला नव्हता. मुख्यमंत्र्यांकडे स्कॅन केलेल्या फाईलवर नाना पवार यांच्या चौकशीसाठी मंजुरी दिल्याचे दिसत होते. या तपासणीनंतर फाईलमध्ये कोणीतरी परस्पर फेरफार केल्याचे स्पष्ट झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या