Ticker

6/Breaking/ticker-posts

गृह-अर्थ खाती स्वतःकडेच ठेवणार ? मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आग्रही

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवीन सरकार आज, रविवारी बहुमत चाचणीला सामोरे जात असतानाच खातेवाटपावरून भाजप आणि शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. एकीकडे गृह आणि अर्थ या खात्यांसह काही महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवण्याबाबत एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे समजते. तर, शिंदे गटाकडे मुख्यमंत्रिपद असल्याने गृह, नगरविकास, महसूल, जलसंपदा यासारख्या खात्यांवर भाजपने दावा केला असल्याचे समजते. त्यामुळे आता या पेचावर कसा काय तोडगा काढला जाणार आहे याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.

 

आज, रविवारी आणि उद्या, सोमवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. या दोन दिवसांमध्ये सरकारवरील विश्वासदर्शक ठराव तसेच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये फारशी अडचण येणार नसल्याची खात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यामुळे आता मंत्रीमंडळात कोणाकोणाला सहभागी करून घ्यायचे आणि खात्यांचे वाटप कसे करायचे यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्रीमंडळात कोणाला स्थान द्यायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि भाजप स्वतंत्रपणे घेणार आहेत. मात्र खातेवाटपाबाबत शिंदे आणि फडणवीस यांच्यात एकमत होणे गरजेचे आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात खातेवाटपाबाबत चर्चा झाली असली तरी अजून काही निश्चित नसल्याचे कळते.

 

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली बहुतेक खाती भाजपला हवी आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असल्याने भाजपला महत्त्वाची खाती हवी आहेत. गृह, नगरविकास, महसूल, ऊर्जा, जलसंपदा यासारखी महत्त्वाची खाती मिळावीत यासाठी भाजपचा आग्रह आहे. मात्र, शिंदे गटाला गृह व नगरविकाससह अर्थ, जलसंधारण, ग्रामविकास, शालेय शिक्षण यासारखी खाती हवी आहेत. त्यातही गृह आणि अर्थ खाते स्वतःकडेच ठेवण्याबाबत एकनाथ शिंदे आग्रही असताना भाजपलाही ही दोन खाती हवी आहेत. त्यातही गृह खात्यासाठी फडणवीस यांचा आग्रह असल्याचे समजते. मागच्या भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये फडणवीस यांच्याकडे गृह आणि नगरविकास यासारखी खाती होती. त्यामुळे आता या सगळ्यावर कसा काय तोडगा निघतो याविषयी दोन्हीकडे उत्सुकता आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या