Ticker

6/Breaking/ticker-posts

चंद्रकांतदादांना नाही, पण विखेंना मिळाली अमित शहांची भेट; उलट-सुलट चर्चाना उधाण..

 

*चार दिवस दिल्लीत थांबूनही चंद्रकांत पाटील-अमित शहांची भेट नाही

*राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांना मिळाली शहांची भेट








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह राज्यातील काही नेत्यांनी चार दिवस दिल्लीत तळ ठोकूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट होऊ शकली नाही. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना मात्र मंगळवारीच शहा यांची भेट मिळाली. या भेटीत सहकार क्षेत्राविषयी चर्चा झाली. नव्या सहकार मंत्रालयामार्फत काय काय करता येऊ शकते यावर भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. भेट न मिळाल्याने चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह दिल्लीला गेलेले नेते कालच मुंबईत परतले असताना दिल्लीत मात्र विखेंची शहा यांच्याशी भेट झाल्याने पाटील यांना भेट नाकारली गेल्याच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे.


भाजपमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळी नावे पुढे येत आहेत. त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष पाटील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहू पाहत आहेत. पाटील चार दिवसांपूर्वी माजी मंत्री राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय यांच्यासोबत दिल्लीला गेले होते. चार दिवस तेथे थांबून त्यांनी पक्षाचे नेते, मंत्री यांची भेट घेतली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शहा यांची भेट झाली नाही. त्यामुळे पाटील कालच परतले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी अधिवेशनाच्या कामात व्यस्त असल्याने मोदी व शहा यांची भेट झाली नसल्याचे सांगून शहा यांनी भेट नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर मंगळवारीच विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची मात्र अमित शहा यांच्याशी भेट झाली. शहा यांच्याकडे नवीन केंद्रीय सहकार मंत्रालयाचा कारभार आल्यानंतर विखे यांनी त्यांची प्रथमच भेट घेतली. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यातील भाजपच्या सहकारी साखर कारखानदारीतील नेत्यांची विखे यांच्या पुढाकारातून नगरच्या विळद घाट येथील विखे पाटील फाउंडेशनमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर या नेत्यांनी चर्चा करून तयार केलेला प्रस्ताव केंद्रीय नेत्यांना दिला होता. त्यातूनच केंदात स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करण्याची संकल्पना पुढे आल्याचे बोलले जाते. सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पकड आहे. त्यांना शह देण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते

केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सहकारातील आणि राज्यातील अन्य नेत्यांनी शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता विखे पाटील यांनी भेट घेतली आहे. या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून काय कामे करता येऊ शकतात. सहकार चळवळीला चालना देण्यासाठी काय करायला हवे यासंबंधी यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. विखे पाटील यांनी यासंबंधीचे एक लेखी निवेदनही शहा यांना दिले. सहकारसोबतच राजकीय दृष्टीनेही या भेटीकडे पाहिले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या