Ticker

6/Breaking/ticker-posts

बैलगाडा शर्यत सुरु करा; परवानगी न दिल्यास मंत्र्यांच्या दावणीला बैल बांधू, भाजप आमदार आक्रमक

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यात बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्जा-राजा जोडीसह मोठ्या संख्येने बैलगाडी चालक व मालकांनी सहभाग घेतला.

निषेध मोर्चाची सुरुवात चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे छत्रपती शिवाजी महाराज व स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. तेथून तितूर नदीवरील नवीन पूल मार्गे तहसील कचेरीहून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व आंदोलकांनी एकत्र येत बैलांचे रिंगण करत उपस्थितांचे लक्ष वेधले. पेटा हटवा, बैल वाचवा’, ‘ बैलगाडा शर्यत सुरू झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत, डफ, ढोलकी वाजवत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या मागणीसाठी निघालेल्या या मोर्चाला नाशिक, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातील बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर आदी तालुक्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी उपस्थित होते.

राज्य शासनाला बीयर बार, डान्स बार सुरू करायला वेळ आहे, श्रीमंतांसाठी रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यती चालतात मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील संस्कृती टिकवणाऱ्या व गोवंश वाढीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या बैलगाडा शर्यती का खुपतात असा सवाल आमदार मंगेश चव्हाण यांनी निषेध मोर्चात केला. हे आंदोलन म्हणजे सुरुवात असून येणाऱ्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व बैलगाडा चालक मालक संघटनांसोबत बैठक घ्यावी व हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी मागणी चव्हाण यांनी केली. बैलगाडा शर्यती सुरू न झाल्यास राज्यातील सर्व बैलगाडा शर्यत प्रेमी मंत्रालयाच्या आणि मंत्र्यांच्या दावणीला बैल बांधून आंदोलन करतील असा इशारा देखील आमदार चव्हाण यांनी दिला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या