Ticker

6/Breaking/ticker-posts

माझे शब्द बरोबर आहेत!; फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर राणेंचं तीरकस उत्तर

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल  मुंबई येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत काल घडलेल्या अटकनाट्यावरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. यावेळी मी काहीच चुकीचं बोललेलो नाही, जे वाक्य बोललो ते परत बोलणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही सडेतोड भाष्य केले. 

नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सोमवारी महाड येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. ' मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन हे माहीत नाही. निदान त्यांनी सचिवाला तरी विचारायला हवं होतं. मी तिथे असतो तर कानाखाली वाजवली असती', असे आक्षेपार्ह विधान राणे यांनी केले होते. त्यावरून शिवसेनेने मंगळवारी तीव्र निदर्शने केली. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आले. शिवसेनेच्या तक्रारीवरून राणे यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.

 दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. नारायण राणे यांच्या वक्तव्याला आमचा पाठिंबा नाही मात्र आम्ही राणे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे फडणवीस म्हणाले. याकडे आजच्या पत्रकार परिषदेत राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर राणे यांनी अत्यंत थेट शब्दांत उत्तर दिले.

' नारायण राणे यांचा राग योग्य आहे पण शब्द जपून वापरले पाहिजेत', असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल, असे पत्रकारांनी विचारले असता 'माझे शब्द बरोबर आहेत. कोर्टाने काय ऑर्डर दिली आहे ते मी तुम्हाला आता वाचून दाखवलंय ना. मग त्यात मी चुकीचं बोललो असं काहीच म्हटलेलं नाही. तरीही आमचे देवेंद्र फडणवीस जे मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेन. मला काहीच हरकत नाही', असे विधान राणे यांनी केले.

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

मुख्यमंत्रिपद हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदावरील व्यक्तीबद्दल बोलत असताना संयम बाळगणे आवश्यक आहे, असे माझे मत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात, त्यावरून एखाद्याच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो पण त्याचा निषेध वेगळ्या पद्धतीनेही व्यक्त केला जाऊ शकतो, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. राणे यांना कदाचित तसं बोलायचं नसेल. बोलण्याच्या ओघात त्यांच्या तोंडून ते वाक्य निघालं असेल. तरीही त्याचे समर्थन मी करणार नाही. त्या विधानाच्या पाठिशी भाजप नसेल पण राणे यांच्या पाठिशी पक्ष उभा आहे, असेही फडणवीस पुढे म्हणाले होते. 

सरकारकडून ज्याप्रकारे कारवाईचे पाऊल उचलण्यात येत आहे, त्याचेही समर्थन होऊ शकत नही. वासरू मेलं तर गाय मारू, अशाप्रकारे सरकार वागत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकारचाही निषेध केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या