Ticker

6/Breaking/ticker-posts

'अरे रडताय काय ? लढायला शिका..!’ मुंडे समर्थक आक्रमक, सुचवला 'हा' पर्याय; पंकजा मुंडे काय निर्णय घेणार ? बैठ्कीकडे लाग्ले राज्याचे लक्ष

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अ.नगर: खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू आहे. बीडनंतर नगरच्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील समारे ३० ते ३५ समर्थकांनी विविध पदांचे राजीनामे पक्षाकडे दिले आहेत. तर पाथर्डीतून 'लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी' स्थापन करण्याचा पर्यायही कार्यकर्त्यांनी सूचविला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत मंगळवारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली असल्याने त्यात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेररचनेत खासदार मुंडे यांना स्थान मिळेल, अशी समर्थकांना आपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. शिवाय यापूर्वी पंकजा यांचीही भाजपकडून उपेक्षा झाली. त्यामुळे नाराजी वाढत गेली. त्याचा परिणाम म्हणून बीड जिल्ह्यातील भाजपच्या मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले. नगर जिल्ह्यातही मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे नेवासा,पाथर्डी आणि शेवगावमधील त्यांच्या समर्थकांनीही आपल्या विविध पदाचे राजीमाने पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सोपविले आहेत. हा प्रकार सुरू असताना मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे. त्यामध्ये चर्चा आणि पुढील भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

पूर्वी एकदा मुंडे नाराज झाल्या होत्या, त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्याचे जाहीर केले होते. यानुसार मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी उपोषणही केले होते. त्या शिवसेनेत जाणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले. अखेर त्यावेळी त्यांचे बंड पेल्यातील वादळ ठरले आणि बाकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा त्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच पाथर्डी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी भाजपपासून वेगळे व्हावे, अशी भूमिका मांडली आहे.

राजीनामे सत्र सुरू झाल्यानंतर तालुक्यातील येळी येथील मुंडे समर्थक दत्ता बडे यांनी सोशल मीडियात लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिले आहे, 'अरे रडताय काय? लढायला शिका. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर या चांडाळ चौकडीच्या विरुद्ध संघर्ष करून आपले विश्व निर्माण केले होते. कुठपर्यंत चपला उचलता. स्वाभिमानाने हातात हात घालून लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी स्थापन करू. त्यामार्फत येणारी प्रत्येक निवडणूक लढवून भाजपाला मुंडे नावात काय ताकद आहे हे दाखवून देऊ.' बडे यांनी स्थानिक पातळीवर सूचविलेल्या या वेगळ्या पर्यायाचे काय होणार? राज्यपातळीवर मुंडे काय निर्णय घेणार? राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देणार, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यावर काय निर्णय घेणार, हे मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या