Ticker

6/Breaking/ticker-posts

गणपतराव देशमुख आता होणे नाही !; आबांना मान्यवरानी वाहिली श्रद्धांजली..

 आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला !


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजता सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते. 'राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोल्याचे माजी आमदार व ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सर्वाधिक काळ आणि सातत्याने गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्त्वाचे वाटते, असे नमूद करत आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

कष्टकरी,शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार
गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 
गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते. इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गणपतरावांना श्रद्धांजली वाहिली.

मंत्री जयंत पाटील
गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला अशा शब्दांत आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

मंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने चार पिढ्यांतील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला आदर्श लोकप्रतिनिधीआणि एक ज्येष्ठ मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्या असल्याच्या शोक भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

साधी राहणी व स्वच्छ प्रतिमेमुळे गणपतराव हे राजकारणातील आदर्श दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्व होते. त्यांनी सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विक्रम रचला होता. दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी हा विक्रम देखील मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावला होता. कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला, त्याच्यामागे गणपतरावांचे अथक प्रयत्न, चिकाटीने काम करण्याची जिद्द होती. मार्क्सवादी विचारांना प्रमाण मानणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सर्वसामान्य गरीब लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठविला. वैयक्तिक स्वार्थ व लाभ मिळविणे हा आमदारांचा एकमेव उद्देश कदापि असू शकत नाही, हे त्यांनी साडेपाच दशकांच्या ध्येयवादी राजकारणातून दाखवून दिले. विधेयकांच्या चर्चेत सहभागी होऊन अभ्यासू संसदपटूची ओळख निर्माण करत सभागृहात त्यांनी आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू संसदपटू व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपलं आहे. अशा भावना अनेस राजकीय,सामाजिक मान्यवरानी आपल्या शोक संदेशात व्यक्त केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या