Ticker

6/Breaking/ticker-posts

थरारक ! जावई रुसला अन् थेट विजेच्या टॉवरवर जाऊन बसला..!

 *मद्यधुंद अवस्थेत तरुण चढला उच्च दाबाच्या विद्युत टॉवरवर

*जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील घटना

*बायकोशी झालेल्या भांडणातून केला शोले स्टाइल स्टंट

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

जालना: जावई हे प्रकरण आपल्याकडं एकूणच नाजूक समजलं जातं. जावयाची मर्जी सांभाळण्यासाठी, त्याचं आगतस्वागत करण्यासाठी सासरची मंडळी जमेल तितके प्रयत्न करत असतात. जावई खूष राहावा हाच सासरच्यांचा प्रयत्न असतो. अनेकदा जावई अशा परिस्थितीचा फायदा उचलताना दिसतात. त्यातून अनेक टोकाच्या घटना घडल्याचंही ऐकायला मिळतं. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात मात्र काहीसा वेगळा प्रकार घडला आहे.

पत्नीसोबत झालेल्या भांडणातून एका तरुणानं 'शोले स्टाइल' स्टंट करून आपला राग व्यक्त केला. फरक इतकाच की हा तरुण उच्च दाबाच्या वीज टॉवरवर चढला. त्यामुळं गावात चांगलीच खळबळ उडाली.

जालना जिल्हयातील सोनखेडा-भराडखेडा शिवारात ही घटना घडली आहे. मंगेश शेळके असं या तरुणाचं नाव आहे. त्यानं मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास मंगेश शेळके हा आपल्या सासुरवाडीतील विजेच्या टॉवरवर चढला. त्याला टॉवर वरून खाली उतरवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण तो खाली उतरण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, परंतु पठ्ठ्या ऐकायला तयार नव्हता. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर गावातील जबाबदार मंडळींनी त्याची समजूत घातली व त्याला खाली उतरवले.

पत्नी सोबत झालेल्या वादातून मंगेश सासुरवाडत येऊन टॉवरवर चढला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या