Ticker

6/Breaking/ticker-posts

धोक्याची घंटा! अनलॉकनंतर 'या' जिल्ह्यात पुन्हा वाढली करोना रुग्णांची संख्या

 






*-अहमदनगर जिल्ह्यात वाढला करोना प्रादुर्भाव

* नव्या आकडेवारीनुसार झालं स्पष्ट

लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

अहमदनगर :- राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार पहिल्या स्तरात समावेश होऊन एक जूनपासूनच निर्बंध शिथील झालेल्या नगर जिल्ह्यात रुग्णसंख्येत चढउतार सुरूच आहे. अनेक दिवसांपासून दोन अंकी रुग्णसंख्या असलेल्या अहमदनगर शहरात मात्र करोना प्रादुर्भावात लक्षणीय वाढ झाली आहे. लपवलेल्यामृत्यूंच्या नोंदी अपडेट करण्याचे काम सुरूच असून आता जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५,३३८ वर पोहोचली आहे.


मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात नगरमधील करोनाची स्थिती अटोक्यात आली होती. त्यामुळे बराच काळ रेड झोनमध्ये समावेश असलेला जिल्हा नव्या निकषानुसार पहिल्या स्तरात आला. त्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली. आज मात्र, त्यामध्ये वाढ झाल्याचे आढळून आले. आज जिल्ह्यात ६८१ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर नव्या ६७९ बाधितांची नोंद झाली. काल ३७९ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर, नव्या ४३७ रुग्णांची नोंद झाली होती.


शहरात वाढला करोनाचा प्रादुर्भाव?

रुग्ण वाढण्याचे प्रमाण पूर्वी ग्रामीण भागात लक्षणीय होते. आज मात्र नगर शहरातील रुग्ण संख्या ११ वरून थेट १४९ वर गेली आहे. संपूर्ण मे महिना नगर शहरात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता. किराणा आणि मेडीकल दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आकडे नियंत्रणात राहून जिल्ह्याचा समावेश पहिल्या स्तरात होण्यास मदत झाली होती. निर्बंध शिथील झाल्यानंतरही अनेक दिवस नगर शहरातील रुग्ण संख्या दोन अंकी होती. नगर शहरासोबतच पारनेर, नगर तालुका, पाथर्डी या तालुक्यांतील रुग्णांची संख्या वाढली आहे.


मृत्यूसंख्येचा आकडाही वाढताच!

नगर जिल्ह्यात दोन्ही लाटांत मिळून करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ५,३३८ झाली आहे. मधल्या काळात नोंदी राहून गेल्या होत्या. त्या सुधारणाच्या आदेश आल्यानंतर सुधारणा सुरू झाली. ९ जून रोजी ३,५७१ मृत्यू होते. त्यामध्ये आठवडाभरात १,७६७ एवढी भर पडली. दुरूस्ती करण्याचे हे काम सुरूच असल्याचे रोज प्रसिद्ध होणाऱ्या आकड्यांवरून दिसून येते.


जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.८० टक्के आहे. आतापर्यंत २,७४,५५८ जणांना करोनाची लागण झाली. त्यातील २,६५,७७३ बरे झाले आहेत. सध्या ३४४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दर गुरूवारी साप्ताहिक आढावा घेऊन पुढील आठवड्यातील निर्बंधांसंबंधी निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच तसे आवाहन केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या