*भाजपचे माजी मंत्री प्रा.
राम शिंदे यांची महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र.
* भाजपच्या ओबीसी आरक्षण बचावतर्फे २६ जून रोजी राज्यात एकाचवेळी
चक्काजाम आंदोलन.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: ‘राज्यातील महाविकास आघाडीचे
सरकार वेळ काढूपणा करीत आहे. त्यामुळे ओबीसी, मराठा तसेच
मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. योग्य वेळी योग्य निर्णय न घेणे,
न्यायालयात योग्य बाजू न मांडणे अशा सरकारच्या निष्काळजीपणामुळे हे
प्रश्न निर्माण झाले आहेत. न्यायालयाशी संबंधित प्रकरणे असली तरी त्यात सरकार
म्हणून बाजू मांडण्यात सरकार कमी पडले आहे. ‘ राज्यात
महाविकास आघाडीचे एकत्रित नव्हे तर तीन पक्षांची तीन सरकारे कार्यरत असल्याची
स्थिती आहे. कोण मंत्री काय निर्णय घेतोय, कोणता अधिकार
कोणाला आहे, याचा कशाचाही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष आपापल्या
पद्धतीने कारभार करीत आहेत,’ अशी घणाघाती टीका भाजपचे माजी
मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज पत्रकार
परिषदेत केली.
प्रा. शिंदे म्हणाले, भाजपचे सरकार होते, तेव्हा
हीच मंडळी राज्य सरकारकडे आरक्षणासाठी भांडत होती, आता
न्यायालय आणि केंद्र सरकरकडे बोट दाखवित आहेत. मात्र, विरोधी
पक्ष म्हणून आमची त्यांना उघडे पाडण्याची जबाबदारी आहे. तेच काम आम्ही करीत आहोत.
त्यामुळे २६ जूनला सकाळी ११ वाजता राज्यातील एक हजार ठिकाणी एकाचवेळी चक्काजाम
आंदोलन करण्यात येणार आहे.’ भाजपच्या ओबीसी आरक्षण
बचावतर्फे २६ जून रोजी राज्यात एकाचवेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
त्याची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी राज्य सरकारवर
सडकून टीका केली. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे
जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे,
ज्ञानेश्वर काळे यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरदेसाई यांचे पत्र आणि त्या
अनुषंगाने शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी केलेल्या तक्रारीसंबधी बोलताना प्रा.शिंदे
म्हणाले, ‘सध्या शिवसेनेचे
मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसेच नेत्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरील विश्वास उडत
चालला आहे. त्यांच्याशी युती करून आपण चूक केली, हे आता
त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे ते असे वागत आहेत. मात्र, भाजपकडून
सत्तेचा गैरवापर करून त्रास दिल्याचा आरोप खोटा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची जर त्रास देण्याचीच भूमिका असती तर काँग्रेस-राष्टवादीच्या
नेत्यांच्या साखर कारखान्यांपुढे अडचणी उभ्या केल्या असत्या. मात्र, तसे होऊ दिले नाही. याउलट आता हे सरकार भाजपच्या नेत्यांचे जे मोजके
कारखाने आहेत, त्यांना त्रास देत आहे. राज्यात सध्या भाजप
केंद्रस्थानी आहे. त्यामुळे या तीन पक्षांत वाद झाले की कोणासोबत कोणी युती करायची
या चर्चेत भाजपचे नाव येणारच. आम्ही आमच्या जागीच आहोत. कोणाकडे गेलेलो नाही.
मात्र, एक ना एक दिवस यासंबंधी काय तो निर्णय नक्की होईल,
अशीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे.’
उपमुख्यमंत्री
अजित पवारांची भेट राजकीय नव्हती
उपमुख्यमंत्री अजित पवार
आणि आपली भेट झाल्याचे प्रा. शिंदे यांनी अखेर मान्य केले. मात्र, ती भेट राजकीय नव्हती. आपल्या मुलीच्या लग्नाचे
निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो होतो. त्यांनी येण्याचे मान्यही केले होते. मात्र,
ऐनवेळी कामामुळे त्यांचा दौरा रद्द झाला, असेही
प्रा. शिंदे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या