Ticker

6/Breaking/ticker-posts

BHR घोटाळ्यातील 'ते' मातब्बर कोण?; जितेंद्र कंडारेची होणार कसून चौकशी

 *मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे याला दहा दिवसांची कोठडी.

*कंडारेने १०० कोटींपेक्षा जास्त ठेव पावत्यांचे मॅचिंग केल्याचा संशय.लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 जळगाव: जळगाव जिल्ह्यातील बीएचआर पतसंस्था अवसायकाच्या ताब्यात असताना झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार संशयित अवसायक जितेंद्र कंडारे याला बुधवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. कंडारे हा गुन्ह्यातील सूत्रधार असून त्याने १०० कोटींपेक्षा जास्त ठेव पावत्यांचे मॅचिंग केल्याचा संशय सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना व्यक्त केला. 

कंडारे याच्यासह या गैरव्यवहारात अनेक मात्तबर असल्याचा संशय व्यक्त करीत त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. सुनावणीअंती न्यायालयाने कंडारे यास दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी पुणे येथील डेक्क्न पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत १८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात बीएचआरशी संबंधित सीए, मालमत्ता खरेदी करणारे व्यापारी, उद्योजक, ठेवींची मॅचिंग करणाऱ्या बड्या हस्तींचा समावेश आहे. 

म्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून कंडारे हा बेपत्ता झाला होता. कंडारे इंदूर मध्ये असल्याची माहिती पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री नऊ वाजता कंडारे जेवणासाठी खाली येताच त्याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी कंडारेला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.

 कोठडीसाठी सरकारपक्षाचा जोरदार युक्तिवाद


जितेंद्र कंडारे याने झंवर पिता-पुत्राशी संगनमत करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली कंडारेला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी न्यायालयाला सांगितले. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी देखील जितेंद्र कंडारे हा अवसायक असल्याने पावत्या मॅचिंग करणे व संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल भावात विकण्यासारखे अनेक कट त्याने रचल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 

कंडारेच्या घराच्या झडतीत बीएचआरशी संबधित तीन हार्ड डिस्क मिळून आल्या आहेत. तसेच ९ लाख ७८ हजार रुपये रोख व २५ लाख २७ हजार ४३६ रुपयांचे दागिने मिळून आले आहेत, त्याची माहिती घ्यायची आहे. कंडारे याने १०० कोटींच्या वर ठेव पावत्यांचे मॅचिंग केले आहे. तसेच कंडारे याने केलेल्या बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे झंवर पिता- पुत्र तसेच कंडारेच्या नातेवाईकांनी संस्थेच्या मालमत्ता विकत घेतल्याचेही मुद्दे युक्तिवादात मांडण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने कंडारेला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपासासाठी संशयित जितेंद्र कंडारे याला जळगाव शहरातील बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य शाखेत देखील आणले जाण्याची शक्यता आहे.

बीएचआर गैरव्यवहारप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यभरात छापेमारे करून ठेव पावत्यांचे मॅचिंग करून कर्जफेड केल्याच्या संशयावरून नुकतीच ११ जणांना अटक केली. यातील ९ जणांना पुणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी जयश्री तोतला व जयश्री मणियार या दोघांचा तात्पुरता जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आता जामीन अर्जावर आज गुरुवारी पुणे न्यायालयात कामकाज होणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या