लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर
कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने
त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही
दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून
राहण्याची गरज पडू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री
उद्वव ठाकरे यांनी
केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविड संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले.
सध्या बऱ्याच पालिका क्षेत्रात रुग्णसंख्या स्थिरावलेली दिसते. धोका टळलेला नाही
पण येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनच्या बाबतीत प्रत्येक
पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर
कुणावरही अवलंबून राहता कामा नये, औषधांचा साठा, व्हेंटिलेटर्स पुरेशा संख्येने आहेत
याची खात्री करून घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सौम्य लक्षणांच्या
घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे जेणेकरून वेळीच योग्य
ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील याबाबत सल्ला देण्यासाठी एक स्वतंत्र
नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची
जबाबदारी द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सागितले.
यावेळी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी
पालिकेच्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, रुग्णांचे
चाचणी अहवाल लगेच देणे, मुंबईतील वॉर्ड वॉर रूम्समार्फत
नागरिकांशी संपर्क आणि समन्वय अधिक वाढविणे, लसीकरण
केंद्रांची संख्या विविध माध्यमांतून वाढविणे याकरिता तात्काळ काही पावले उचलण्यात
आली आहेत, त्याविषयी माहिती दिली. बीकेसी येथील जम्बो
केंद्राचे डॉ. राजेश डेरे यांनीदेखील केंद्रातील रुग्णाच्या नातेवाईकांना मोबाईल
एपद्वारे उपचारांविषयी सर्व अद्ययावत माहिती कशी दिली जाते त्याची माहिती दिली.
ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर,
भिवंडी निझामपूर, पनवेल, नवी मुंबई , वसई विरार पालिका आयुक्तांनी
त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांनीदेखील आपापल्या भागातील
रुग्ण संख्या स्थिरावत आहे तरी रुग्णांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्याचे
आव्हान कायम असून विविध सुविधा, औषधे या माध्यमातून प्रयत्न
करण्यात येत असल्याची माहिती दिली.
0 टिप्पण्या