Ticker

6/Breaking/ticker-posts

आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी व्यापाऱ्याला घातला गंडा !

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नागपूर: आमच्या आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी नकली दागिने देऊन मिरची व्यापाऱ्याला साडे चार लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना नागपूर एमआयडीसीतील जयताळा भागात घडली. मिरची व्यापारी सुभाष नाथुजी वाघमारे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन अनोळखी तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

दि. ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास हे दोन तरुण सुभाष वाघमारे यांच्या दुकानात आले. दुकानात दोघेही रडायला लागले. वाघमारे यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता आईला करोना झाला आहे. उपचारासाठी पैसे नाहीत. आमच्याकडील सोन्याचे दागिने ठेवा व आम्हाला सहा लाख रुपये द्या, असे ते वाघमारे यांना म्हणाले. दोघांनी वाघमारे यांना सोन्याचे चार मणीही दिले. वाघमारे यांनी लगेच सराफाकडून त्याची तपासणी केली असता ते सोन्याचे असल्याचे सराफाने सांगितले.

हे तरुण नंतर चारही मणी घेऊन गेले आणि काही वेळाने पुन्हा वाघमारे यांच्या दुकानात आले. तेव्हा मी तुम्हाला साडे चार लाख रुपये देतो
, असे वाघमारे यांनी युवकांना सांगितले. त्यावर दोघांनी वाघमारे यांना सोन्याची माळ दिली व वाघमारे यांनी त्यांना साडेचार लाख रुपये दिले. दरम्यान, या माळेची तपासणी केली असता त्यातील मणी नकली असल्याचे सराफाने सांगितले. त्यामुळे वाघमारे यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वाघमारे यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या