लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
संगमनेर:- सध्या
बहुतांश नागरिकांची धावपळ सुरू आहे ती करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी. सकाळी लवकर
उठून लसीकरण केंद्रासमोरील रांगेत उभे राहायचे. दिवसभरात लस मिळाली तर ठीक अन्यथा
दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत. असेच चित्र बहुतांश ठिकाणी पहायला मिळत आहे. संगमनेर
तालुक्याच्या पठार भागात मात्र ही लस दूरच तेथे पाणी टंचाईचा सामना करावा लागत
आहे. वाड्यावस्तांवरील महिलांना हंडे घेऊन डोंगराची चढउतार करावी लागत आहे. ना
करोनाची भीती ना लसचे टेन्शन. पाणी मिळाले की दिवस सार्थकी लागला, अशीच त्यांची अवस्था आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई
भासू लागली आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरुन खाली यावे
लागत आहे. दरवर्षीच उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. मात्र, तेव्हा टँकर सुरू केले
जातात. यावर्षी प्रशासकीय यंत्रणा करोनासंबंधीच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे.
त्यामुळे टँकरसंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही.
मे महिना सुरू झाल्यानंतर दिवसेंदिवस
उन्हाची तीव्रता वाढली आणि पठारभागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वनकुटे
गावापासून उंच डोंगरावर पाबळ व नंदाळे पठार अशा विविध आदिवासी वाड्यावस्त्या आहेत.
वाड्यांपासून एक ते दीड किलोमीटर अंतर डोंगराच्या पायथ्याशी पाण्याची विहीर आहे.
वाड्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने येथील महिला, पुरुष, लहान मुले हंडे घेऊन पाणी
आण्यासाठी डोंगर उतरुन खाली येतात. पुन्हा विहिरीतून पाणी शेंदून हंडा भरायचा आणि
डोक्यावर दोन ते तीन हंडे घेवून डोंगर चढायचा, असा त्यांचा
दिनक्रम सुरू आहे.
वर्षांनुवर्षांपासून अशा पद्धतीने आदिवासी
लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या वनकुटे गावठाण, नंदाळे पठार, पाबळ
पठार, गांगड वस्ती या ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली
आहे. त्यामुळे भर उन्हात महिला पाणी वाहून नेत असल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत
आहे.
या भागात पाण्याचे टँकर सुरू करण्याची
मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासंबंधी ग्रामसेवकांनी प्रस्तावही तयार करून
पाठविले आहेत. मात्र, महसूलसह
सर्व यंत्रणा सध्या करोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने पाणी टंचाई
आणि टँकरसंबंधीच्या बैठका अद्याप झालेल्या नाहीत. केवळ संगमनेर तालुकाच नव्हे
जिल्ह्यातील इतरही टंचाईग्रस्त भागात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
0 टिप्पण्या