Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक ठरण्याची चर्चा, मात्र दिलासादायक बातमी

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

पाथर्डी : करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याची चर्चा सुरू असताना पाथर्डीतून एक दिलासादायक बातमी आहे. पाथर्डीतील सुमनताई ढाकणे कोविड केअर सेंटरमधून दहा वर्षांच्या आतील चार बालकांनी करोनावर यशस्वी मात केली. आठ दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी त्यांना केंद्रातून निरोप देण्यात आला.

उपचारादरम्यान ही बालके तेथे चांगलीच रमली होती. शंभरी ओलांडलेल्या महिलांनी करोनावर यशस्वी मात केल्यानंतर आता बालकांनीही करोनाला हरविल्याची उदाहरणे पुढे येत आहेत.

पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दोन आणि तिनखडी येथील दोन भावंडांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. शिवाय लहान मुले असल्याने बऱ्याच रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सुमनताई ढाकणे कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना दाखल करून घेण्यात आले.

केंद्रात दाखल झाले तेव्हा या लहानग्यांना प्रचंड अशक्तपणा होता, नीट उभेही राहता येत नव्हते, पालकही घाबरलेले होते. अशाही परिस्थितीत केंद्रातील डॉक्टरांनी पालकांची संमती घेऊन उपचाराचे आव्हान स्वीकारले. मुलांनी उपचाराला प्रतिसाद दिला. तणाव येणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्यासोबत हसत खेळत उपचार करण्यात आले. आठ दिवसांत ही बालके बरी झाली. एखाद्या कोविड सेंटरमधून एकाचवेळी चार मुले बरी होऊन परतण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.


कोविड सेंटरच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी मुख्य समन्वयक शिवाजी बडे, कार्यकर्ते योगेश रासने, नासीर शेख, हुमायून आतार, अक्रम आतार, महादेव आव्हाड, किशोर डांगे, वैभव दहिफळे यांच्यासह एम.एम. निऱ्हाळी विद्यालयाचे स्वयंसेवक शिक्षक उपस्थित होते. मुलांचे पालक त्यांना घेऊन जाण्यासाठी आले होते.

दरम्यान
, या मुलांच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यांनाही करोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यावर अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर यातील दोघांच्या वडिलांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावरही याच केंद्रात उपचार करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या