Ticker

6/Breaking/ticker-posts

..अन् ‘मृतदेह’ उठून उभा राहिला, पोलिसांसह सर्वच चक्रावले

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

राहाता :-गावातील चिंचेच्या झाडाखाली बेवारस मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस यंत्रणेसह तेथे गेले. गावकरीही जमले. तपासणी सुरू असताना त्या व्यक्तीच्या डोळ्यांची हालचाल झाली. तो मृत नसून जिवंत असल्याचे खात्री पटल्यावर लोकांनी त्याला पाणी पाजले. थोड्यावेळातच ती व्यक्ती ताडकन उठून उभी राहिली. राहाता तालुक्यातील केलवड गावात ही घटना घडली. सुरवातील ग्रामस्थ त्याला मृतदेह समजले असले तरी त्यांच्यासह यंत्रणेने तातडीने हालचालींमुळे एक भूकबळी जाताजाता वाचला.

राहाता तालुक्यात केलवड गाव आहे. गावापासून काही अंतरावर शिर्डी बायपासवर एका चिंचेच्या झाडाखाली एक व्यक्ती दोन दिवसांपासून निपचित पडून असल्याचे काही गावकऱ्यांनी पाहिले. त्यांना ती व्यक्ती मरण पावली असावी, असा संशय आला. त्यांनी ही माहिती पोलिस पाटील सुरेश गमे यांना दिली. गमे यांनी ही माहिती राहाता तालुका पोलिसांनी कळविली. गावात बेवारस मृतदेहा आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष भोये आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्या कथित मृतदेहाची पाहणी सुरू झाली.

सुमारे ५५ वर्षांच्या या व्यक्तीने पँट शर्ट घातलेला होता. दाढी वाढलेली होती. पोलिस नाईक पंकज व्यवहारे, पोलिस नाईक चंद्रकांत भोंगळे व इफ्तिकार सय्यद यांनी जवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी व्यवहारे यांना त्या व्यक्तीच्या डोळ्यांची हालचाल झाल्याचे जाणवले. त्यामुळे हा मृतदेह नसून जिवंत व्यक्ती असल्याची खात्री पटली. त्यामुळे तातडीने हालचाली सुरू झाल्या. त्या व्यक्तीला पाणी पाजण्यात आले. ओआरएस पेयही आणून पाजण्यात आले. त्यामुळे अंगात त्राण आल्याने ती व्यक्ती उठून बसली. आपल्याभोवती जमलेली गर्दी, आलेले पोलिस पाहून भांबावून गेल्याने थोडी शुद्ध येताच ती व्यक्ती तडक उठून उभी राहिली.

मग पोलिसांनी विचारपूस सुरू केली. त्या व्यक्तीने आपले नाव पंकज चंद्रकांत सोनवणे (वय ५५, रा. अंमळनेर, जि. जळगाव) असे सांगितले. रेल्वेत लेखा विभागात नोकरीला असल्याचे सांगितले. त्याच्या खिशात मोबाईल, नाव, पत्ता सापडला. त्यावरूनही खात्री पटली. पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क केला. भाऊ त्याला घेण्यासाठी जळगावहून राहात्याकडे निघाला आहे. मात्र, सोनवणे तेथे कसे आले? याबद्दल त्यांनाही काही सांगता आले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या