Ticker

6/Breaking/ticker-posts

कत्तलीसाठी आणली होती जनावरे, पोलिसांनी मध्यरात्रीच मारले छापे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- संचारबंदीचे नियम कडक केलेले असले तरी शहरातील झेंडीगेट भागातील अवैध कत्तलखाने  राजरोसपणे सुरू होते. कोतवाली पोलिसांनी रात्री तेथे छापा मारला. यात तीनेश किलो मांस जप्त केले, तसेच २४ जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेकदा कारवाई होऊनही या भागात अवैध कत्तलखाने सुरूच आहेत. सध्या संचारबंदीचे कडक निर्बंध असले तरी कत्तलीसाठी ग्रामीण भागातून जनावरे आणणे आणि त्यांचे मांस शहरासह अन्यत्र विकण्याचे प्रकार सुरू असल्याचे आढळून आले.

नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. झेंडीगेट भागात कत्तलखाने सुरू असून त्यासाठी आणण्यात आलेली जनावरे विविध ठिकाणी बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा मारला. तेथे इसरार ऊर्फ इच्चु मुक्तार कुरेशी, तबरेज आबीद कुरेशी, मुज्जु जानेमीया कुरेशी, व तौफिक युनिस कुरेशी (सर्व रा. झेंडीगेट,अ .नगर) यांना पकडण्यात आले. यांच्याकडून सुमारे २ लाख, ९० हजार रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये जनावारांचे मांस व २४ जनावरांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून २४ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करण्यात आली.

गोवंशीय जनावरांची कतल करण्याला मनाई असतानाही आरोपींनी ही जनावरे कत्तलीसाठी आणली होती. आरोपींविरूद्ध भारतीय दंड विधानातील कलमांसोबतच महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम १९९५ चे कलम ५ (क) ९ (अ.) सह प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम १९७६ कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, हेमंत भंगाळे, सतीष शिरसाठ, मनोज कचरे, हेमंत खंडागळे, सुजितकुमार सरोदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


आरोपी ग्रामीण भागातून जनावरे खरेदी करून आणतात. वाहतूक करताना संशय येऊ नये यासाठी जनावराच्या मालकाला सोबत आणले जाते. त्यानंतर शहारात कत्तलखान्याच्या परिसरात पडक्या घरांच्या जागी बंदिस्त जागेत जनावरे बांधून ठेवली जातात. कत्तलखान्याचे बहुतांश काम रात्री चालते. काही वेळातच कत्तल करून वाहनांद्वारे मांस पाठविण्याचे काम केले जाते. अनेक यातील अनेक कत्तलखाना चालकांचे पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा होते. त्यामुळे अधूनमधून अशी कारवाई होत असली तरी कत्तलखाने पुन्हा सुरू होतात. नगर शहर व संगमनेरहून मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस मुंबईला पाठविण्यात येते. स्वस्तात जनावरे खरेदी करून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळविण्याच्या या व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जम बसविला असल्याचे सांगण्यात येते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या