Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेसचा विरोध मावळला ; युवक काँग्रेसच्या संभाव्य लॉकडाउनसाठी सज्जतेच्या सूचना..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अहमदनगर:-करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने राज्यात लॉकडाउन करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. याला विरोधही सुरू झाला आहे. असे असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे मात्र संभाव्य लॉकडाउनसाठी सज्ज राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे  यांनी लॉकडाउनची शक्यता गृहित धरून कार्यकर्त्यांनी समाजाला आवश्यक ती मदत करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले आहे. यापूर्वी काँग्रेसने लॉकडाउनला विरोध दर्शवला होता. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता पक्षाचा लॉकडाउनला असलेला विरोध मावळला असल्याचे स्पष्ट होत आहे.

 लॉकडाउनच्याविरोधात भाजपने आधापासून आवाज उठविण्यास सुरवात केली आहे. मनसेही याच्या विरोधात आहे, राष्ट्रवादीनेही लॉकडाउन नको अशी भूमिका घेतली आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी लॉकडाउन करायचा असेल तर आधी जनेतला थेट मदत करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा एकदा लॉकडाउनचा इशारा दिला आहे. त्यामुळे विरोधकांसह नागरिकांमधूनही याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


तर दुसरीकडे युवक काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तांबे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे की, मागील वर्षी नियोजनशून्य पध्दतीने लावलेल्या लॉकडाऊनमध्ये आपण समाजातील विविध घटकांची अडचण लक्षात घेता सर्वोतोपरी मदत केली होती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने वर्षभर चालवलेल्या या मदतकार्यात ५० लाखांपेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष धान्य आणि जेवण वाटप केले होते. रक्तदानातून २८ हजार २०० रक्तपिशव्यांचे संकलन, लाखो लोकांना मास्क व आर्सेनिक अल्बम-३० व इतर औषधांचे वाटप केले होते. वस्त्यांचे निर्जंतुकीकरण, करोना योद्ध्यांचा सत्कार, ऑनलाइन छत्रपती युथ फेस्टिव्हल असे विविध उपक्रम हाती घेतले. आपण केलेल्या कामाचे समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुकही झाले होते. आता परत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा अंशतः किंवा पूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. तरी आपण आपल्या परिसरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वोतोपरी मदतीसाठी तयार राहावे, असे आवाहन तांबे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.


सत्ताधारी आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या युवक शाखेने अशी तयारी सुरू केल्याने लॉकडाउनची शक्यता अधिक गडद झाल्याचे मानले जाऊ लागले आहे. त्यातच आज दुपारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर तांबे यांनी हे आवाहन केल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या