Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. विखे पाटलांनी उभारली कोविड सेंटरमध्ये गुढी, रुग्णांना जेवणही वाढले

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अहमदनगर: करोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सर्वत्र साधेपणाने साजरा केला जात असताना नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र थेट कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन तेथील रुग्णांसोबत सण साजरा केला. शिर्डीतील कोविड केअर सेंटरमध्ये त्यांनी गुढी उभारली तसेच तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणही वाढले. करोनामुळे घरापासून दूर राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी आपण येथे आल्याचे विखे पाटील सांगितले.

खासदार विखे पाटील यांनी शिर्डीतील कोविड रुग्णालयास भेट दिली. तेथे त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी पीपीई कीट घालून डॉक्टर व अन्य अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. उपचार घेणाऱ्या रुग्णांना विखे यांच्या हस्ते जेवण वाटप करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मनावर या संकटाची भीती कायम आहे. पारंपरिक सण असूनही कुटुंबीयांसमवेत साजरा करता येवू शकत नाही. त्यांचे हे दु:ख हलके करण्यासाठी आपण येथे आल्याचे विखे यांनी सांगितले.


या संकटला घालविण्यासाठी उपाय योजनांबरोबरच नियमांचे पालन आणि निर्बधांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प यानिमित्ताने सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी केला. शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के वैद्यकीय अधिकारी मैथिली पितांबरे, डॉ. गोकुळ घोगरे डॉ. संजय गायकवाड, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


करोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटरमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या. बेडची व्यवस्था आॅक्सिजन सुविधा आणि आवश्यक असणारी उपचाराची साधन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने डॉ. विखे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यांनी बराच काळ अधिकारी आणि तेथील रूग्णांसोबत घालवून त्यांना दिलासा दिला. करोना काळातही विखे जिल्ह्यात बिनधास्त फिरून कार्यक्रम व बैठका घेत होते. आज कोविड केअर सेंटरमध्ये जाताना मात्र त्यांनी मास्क लावल्याचे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या