Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात कडक लॉकडाउन अटळ; मुख्यमंत्री करणार आज घोषणा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:-करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या वाढतच असल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आज, बुधवारी यासंदर्भातील घोषणा करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. दरम्यान, लॉकडाउन किती दिवसांचा जाहीर करायचा, कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, सार्वजनिक वाहतुकीबाबत काय करायचे, गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हाबंदी लागू करायची किंवा कसे याबाबत मंगळवारी रात्री चर्चा होऊन मार्गदर्शक सूचना जारी होणार आहेत.

मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात करोनारुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, ऑक्सिजनची कमतरता आणि औषधांचा तुटवडा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाउन करावा, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत झाली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली. लॉकडाउन लागू करताना कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, कोणत्या बंद करायच्या याबाबत आज, बुधवारी निर्णय होईल. त्या निर्णयानुसार मार्गदर्शक सूचना जारी झाल्यानंतर मंगळवारच्या सूचना रद्द होतील, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. तर, कठोर निर्बंध, वीकएण्ड लॉकडाउन, रात्रीची संचारबंदी लागू करूनही रुग्णसंख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात काही तासांतच लॉकडाउन जाहीर होऊ शकेल, असे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बैठकीनंतर सांगितले.

मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांचा दबाव

राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाउनबाबत आजच निर्णय घ्या असा दबाव मंत्र्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टाकल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

' गेल्या वेळी लॉकडाउन मागे घ्या, असे काही मंत्रीच म्हणायचे. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. सगळे नियंत्रणाबाहेर जात आहे. पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीत. त्यामुळे लॉकडाउन करण्याची सूचना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. लोक घराबाहेर पडू नयेत यासाठी जे करता येईल ते करावे लागेल,' असेही आव्हाड म्हणाले.

कठोर निर्बंधाची गरज

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यात कडक लॉकडाउन लागणार असल्याचे सांगितले. राज्यातील करोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाउन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. करोनाची ही साखळी मोडण्यासाठी कठोर निर्बंधाची गरज असून मुख्यमंत्री बुधवारी याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्य सरकारने स्वतःचा ३०० मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. हा प्रकल्प करोनापश्चातही सरकारच्या उपयोगी पडू शकतो, असेही शिंदे यांनी सांगितले.

परदेशी लसखरेदीसाठी केंद्राकडे मागणी करणार

राज्यातील लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशातून करोना प्रतिबंधक लस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. परदेशातून लस खरेदी करण्याची परवानगी मिळाली तर राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण वेगाने पूर्ण करता येईल, असे टोपे यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

करोनारुग्णांसाठी ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे, कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा काढण्याची वाट न बघता ठाणे, कोल्हापूरचा आधार घेऊन निर्णय करावा. प्रकल्प उभारण्यात व्यत्यय येऊ नये, दिरंगाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या