Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यावर दुसरं संकट; केवळ ५-६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक

 


लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: राज्यातील करोनाच्या (Corona) उद्रेकाचा परिणाम थेट रक्ताच्या साठ्यावर पडला असून राज्यात केवळ पुढील ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. करोनासोबतच आता हे नवे आव्हान राज्य सरकारपुढे उभे ठाकले असून राज्यातील नागरिकांना आणि रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.

राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर हळूहळू रक्तदानावर परिणाम होऊ लागला. त्यानंतर करोनाचा उद्रेक झाल्यानंतर हे काम जवळजवळ ठप्पच झाले. आता तर केवळ ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. राज्यातील शेकडो रुग्णालयांमध्ये नियमितपणे महत्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रियांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. जर रक्ताचा साठा वाढला नाही, तर अशा रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. याचा विचार करून राज्य शासनाने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

मागीलवर्षी देखील अनेकदा असा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या-त्यावेळी रक्तदान वाढवून ती समस्या दूर करण्यात आली. आताही ५ ते ६ दिवस पुरेल इतरा, तर काही ठिकाणी १० दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. ही परिस्थिती लक्षात घेता राज्यात सर्व रक्तपेढ्यांनी आपला साठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याच प्रमाणे राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदानासाठी प्रयत्न करावेत. शिवाय राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापल्या विभागांमध्ये रक्तदानाची शिबिरे आयोजित करून हा रक्तसाठा वाढवावा, असे आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची मोठी वाढ होत असून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मर्यादित स्वरुपाचे लॉकडाउन आणि कडक नियमावली लागू करण्यात आलेली आहे. इतकेच नाही, तर नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत, तसेच करोना बाधित रुग्णांची संख्या अशीच झपाट्याने वाढत गेल्यास सरकारला राज्यात लॉकडाउन लागू करण्याशिवाय पर्याय नसेल, असेही राज्य सरकारने स्पष्टपमे म्हटलेले आहे. या पार्श्वभूमीवर रक्तसाठा वाढवणे हे मोठे आव्हान असणार आहे. रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना आता पुढाकार घेत या समस्येवर मार्ग काढण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. शिवाय करोनासारख्या संकटाचा सामना करत लोकांनाही पुढे यावे लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या