Ticker

6/Breaking/ticker-posts

'लेटरबॉम्ब'ची ठाकरे सरकार करणार चौकशी; देशमुख यांचंही महत्त्वाचं ट्वीट

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत सचिन वाज़े यांच्यामार्फत पैसेवसुलीचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे राज्याचं पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली असतानाच ठाकरे सरकारने एक पाऊल मागे येत या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, अनिल देशमुख यांनी रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी एक महत्त्वाचं ट्वीटही या संदर्भात केलं आहे.

अनिल देशमुख यांनी सध्या निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करतानाच अनिल देशमुख यांचा राजीनामाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागितला आहे. दरम्यान, फडणवीस यांची राजीनाम्याची मागणी आधीच महाविकास आघाडी सरकारने फेटाळलेली असून आता चौकशीचे पाऊल मात्र उचलण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बुधवारी रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खुद्द अनिल देशमुख यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आयोगाचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती असतील व हा आयोग लवकरच नेमण्याचा निर्णयही या बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसोबतच सध्या फोन टॅपिंग आणि गोपनीय रेकॉर्ड लीक होण्याचे प्रकरणही गाजत आहे. त्यावर बैठकीत गंभीर चर्चा झाली व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे सूत्रांनी पुढे नमूद केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन राज्यात गेले काही दिवस घडत असलेल्या सर्व घटनांचा अहवाल सरकारकडून मागवावा अशी मागणी केली. त्याला शह देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते व मंत्री आज राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

अनिल देशमुख यांचं सूचक ट्वीट
अनिल देशमुख यांनी रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. ' मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते...', असे  देशमुख यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. या संदर्भात २१ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रही या ट्वीटसोबत देशमुख यांनी जोडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या