पीक नुकसान भरपाई पोटी शेवगावच्या तहसीलदारांनी वरुर खुर्दच्या दिलेला चेक वटणावळीविना आला रिटर्न..!
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव (जगन्नाथ गोसावी) : -शेवगाव शिवारातील वरूर खुर्दच्या ६३ खातेदार शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० च्या पीक नुकसान भरपाई पोटी शेवगावच्या तहसीलदारांनी दिलेला सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा चेक बॅक अकाउंटला पैसे शिल्लक नसल्याने वटणावळ न होता रिटन आला आहे.महाराष्ट्र बँकेच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला. महसुल लिपिकाच्या बेपर्वाईमुळे तहसीलदारांवर मात्र याबाबत सारवासारव करण्याची नामुष्की ओढावली आहे. ट्रेझरीत बिल पास (मंजूर) होण्याआधीच बँकेला चेक पाठवण्यात आल्याने ही नामुष्कीची परिस्थिती उद्भवल्याचे विश्वसनीयरित्या समजले.
गेल्या वर्षी सन २०२० मध्ये खरीप हंगामात सलग तीन-चार महिने तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयाकडे नुकसानीची रक्कम अदा केली. ही रक्कम मिळावी यासाठी वरूर खुर्दच्या ६३ शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यापासून तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवले.मात्र, तहसील प्रशासनाने त्यांचे गाऱ्हाणे नीटपणे ऐकून घेतलेच नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी ८ मार्चला लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले व दिं. ९ मार्चला ६३ शेतकऱ्यांच्या यादीसह ५ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा भारतीय स्टेट बँकेच्या शेवगाव शाखेचा चेक (क्रं.४४२८३३) महाराष्ट्र बँकेच्या वरुर बुद्रुक शाखेकडे तलाठ्यामार्फत सुपूर्द करण्यात आला.
बँक प्रशासनाने सदरील चेक तातडीने कलेक्शनसाठी स्टेट बँकेत पाठवला. मात्र, तहसीलदारांच्या खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने तो रिटन आला. सद्य परिस्थितीत दहा दिवस उलटले तरी बँक खाती पैसे जमा न झाल्याने शेतकऱी संतप्त झाले असून त्यांच्या बँकेत येरझारा सुरू झाल्या आहेत. परिणामी, बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
*चेकमध्ये त्रुटी*
बँक अकाउंटला पुरेशी रक्कम उपलब्ध आहे. चेक चुकल्याने शेतकऱ्यांच्या खाती पैसे जमा करण्यास विलंब झाला.त्यातच शेवगावच्या ट्रेझरीतून सहकार्य मिळाले नाही, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खाती पैसे जमा होतील. - अर्चना भाकड - पागिरे (तहसीलदार)
*चेक बिनचुक ... पण
तहसील प्रशासन चेकसंदर्भात सारवासारव करत आहे. चेक बिनचूक असल्याची खातरजमा आपण केली असून तो न वटता परत आला, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात आपण तहसीलदार व बँक व्यवस्थापनाशी चर्चा केली.ही बाब गंभीर असून ती शेतकऱ्यांची चेष्टा ठरते. - माणिकराव म्हस्के (लाभार्थी शेतकरी)
0 टिप्पण्या