Ticker

6/Breaking/ticker-posts

रेशनवरील ८ टन तांदूळ ट्रकमधून जात होते घेऊन, पोलिसांनी केला पाठलाग.. अन्

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

परभणी: रेशनवरील आठ टन तांदूळ अवैधरित्या काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रकमधून वाहून नेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात शनिवारी (२० मार्च) रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून दोन लाख ८० हजार रुपये किंमतीचा तांदूळ आणि पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण सात लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणात जय आप्पा अंभोरे ( राशन गोदाम मालक, रा. बसस्थानक मारोतीनगर, सेलू), ट्रक चालक शेख रहीम शेख उस्मान, (रा. मोमीनपुरा, ईदगाहनगर, मंठा), ट्रक मालक ईसाभाई कुरेशी ( रा.कुरेशी मोहल्ला, मंठा) या तिन्ही आरोपींविरुद्ध नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूवारी (१८ मार्च) सेलू येथील नूतन महाविद्यालयासमोर परभणी स्थानिक गुन्हे शाखा व सेलू पोलिसांच्या पथकाने कारवाई करून आरोपींकडून ८० क्विंटल (८ टन) रेशनचे तांदूळ असलेला ट्रक पोलिसांनी पकडला. ट्रकमध्ये तांदूळ, रिकामी पोती आणि शिलाई मशीन आढळली. ट्रकचालक शेख रहेमान याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने संबधित ट्रक देऊळगाव गात येथील गोदाम येथून भरून मंठा येथे जात असल्याचे सांगितले होते. महसूल प्रशासनाकडून प्राप्त अहवालात तांदूळ रेशनचेच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपीवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, पोलीस उपनिरिक्षक संतोष माळगे, कर्मचारी बालासाहेब तुपसमिंद्रे, शेख मोबीन, श्री.निळे, रामेश्वर मुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे करत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाला असला, तरी तिन्ही आरोपी मोकाट फिरत आहेत. रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्री करणार्‍या सक्रिय टोळीशी आरोपींचा संबंध आहे, की नाही याचाही शोध घेतला जावा, अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या