Ticker

6/Breaking/ticker-posts

ममतांच्या 'जखमां'वर मलमपट्टी ; यशवंत सिन्हा तृणमूलमध्ये दाखल..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

कोलकाता : अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसची वाट धरलीय. शनिवारी दुपारी यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते. शनिवारी सकाळी यशवंत सिन्हा कोलकाताला दाखल झाले. इथे त्यांनी तृणमूल काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारममता बॅनर्जी यांच्याकडून दिनेश त्रिवेदी यांच्या जागेवर यशवंत सिन्हा यांना राज्यसभेत धाडलं जाऊ शकतं.

'  ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये जो हल्ला झाला. तो टिपिंग पॉईंट होता. तेव्हाच मी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा आणि ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला', असं स्पष्टीकरण यशवंत सिन्हा यांनी दिलं.

' अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपचा सर्वसाधारण सहमतीवर विश्वास होता परंतु, आजच्या सरकारचा केवळ दडपशाही आणि जिंकण्यावर विश्वास आहे. अकाली दल, बीजेडी देखील भाजपमधून वेगळे झाले आहेत. आज भाजपसोबत कोण उभं आहे?' अशी टीका यावेळी यशवंत सिन्हा यांनी भाजपवर केली. या पार्श्वभूमीवर अनेक नेते तृणमूल काँग्रेसचा हात सोडत भाजपच्या गोटात दाखल होत आहेत. अशावेळी यशवंत सिन्हा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं तृणमूल काँग्रेसला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरू शकतो.


आयएएसची नोकरी सोडून यशवंत सिन्हा राजकारणात दाखल झाले होते. चंद्रशेखर सरकारमध्येही ते मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयींच्या ते अगदी जवळचे नेते होते. परंतु, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप मात्र वेगळी असल्याचं मत त्यांनी अनेकदा व्यक्त केलं. यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारचा अनेकदा विरोध केला होता. मोदींच्या आर्थिक धोरणांसहीत परराष्ट्र धोरणांवरही त्यांनी अनेकदा उघडपणे टीका केली होती. 
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा यांची नाराजी उघड झाली होती. मात्र यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा हे मात्र अजूनही भाजपचे खासदार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या