Ticker

6/Breaking/ticker-posts

वेषांतर करुन फिरत होता बाळ बोठे ; अटकेचा चित्तथरारक सिनेस्टाईल घटनाक्रम !

 





 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगरः सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड सावेडी, नगर) हा हैद्राबादमधील बिलालनगर या गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भागात लपून बसला होता. पीचएडीची पदवी घेण्यासाठी तो उस्मानिया विद्यापीठात असताना झालेल्या ओळखीच्या आधारे तो या भागात लपून बसला होता. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या तेथील एका वकिलानेच त्याला यासाठी मदत केली होती. शेवटी नगरच्या पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्यासह मदत करणाऱ्या आरोपींनाही अटक केली. आधुनिक तंत्रज्ञानाही गुंगारा देत सराईत गुन्हेगाराप्रमाणे आरोपी लपून बसला होता.

गुन्हेगारी कथानकावर आधारित एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीचा हा घटनाक्रम आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि तपास अधिकारी उपअधीक्षक अजित पाटील यावेळी उपस्थित होते. तीन आरोपींना कालच अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीला सकाळी अटक करण्यात आली आहे. त्याला घेऊन पोलिस पथक नगरला निघाले असून आरोपीला दुपारनंतर पारनेरच्या न्यायालयात हजर केले जाईल.


गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला जरे यांची हत्या झाली होती. या गुन्ह्यात नाव आल्यापासून बोठे फरार झाला. काही दिवस इतत्र राहिल्यानंतर याने हैदराबाद गाठले. पूर्वी त्याने याच भागातील उस्मानिया विद्यापाठातून पीचएडी मिळविलेली आहे. त्यावेळी तेथील जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, तेलंगाना) या वकीलाशी त्याची ओळख झाली होती. गुन्हेगारांना आश्रय देऊन हवी ती मदत मिळवून देण्यासाठी हा वकील कुप्रसिदध आहे. त्याचीच मदत बोठेने घेतली. चंद्रप्पा याने त्याला बिलालनगर या गुन्हेगारांच्या लपण्याच्या कुप्रसिद्ध भागात ठेवले होते. पोलिसांना पक्की खबर मिळाली तेव्हा पोलिस याच भागातील प्रतिभानगर परिसरातील एका हॉटेलवर गेले. त्यातील रूम नंबर १०९ मध्ये बोठे लपून बसल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र, रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी बोठे याने तेथे बी. बी. पाटील या नावाने बुकिंग केलेले होते. ओळख लपविण्यासाठी तो दाढी वाढवून आणि वेष बदलून वावरत होता. मात्र, तो तेथेच असल्याची माहिती पक्की असल्याने पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि बोठे पकडला गेला. भल्या सकाळी ही कारवाई करण्यात आली. रुममध्ये बोठे एकटाच होता. त्याला ताब्यात घेण्यात आले.

 याशिवाय त्याला मदत करणारा चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय २५ रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय ३० रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय ५२, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली, तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैद्राबाद) ही महिला फरारी आहे. बोठे याला नगरमधून मदत करणारा महेश वसंतराव तनपुरे (वय ४०, रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, नगर) याला आज सकाळी अटक करण्यात आली. तनपुरे हा बोठेशी नगरमधून संपर्कात राहत होता व येथून मदत करीत होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.


बोठे याच्या खोलीतून काही मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. फरार असल्याच्या काळात त्याने अनेक मोबाईल वापरले. त्यातील एक मोबाईल नंबर तर २०११ मध्ये एका कुख्यात गुन्हेगाराने वापरलेला आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांत सुमारे शंभरहून अधिक ठिकाणी शोध मोहीम राबविली. हैदराबादमध्ये तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती. तेथेही तीन ठिकाणांहून पोलिस पोहचण्यापूर्वी पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. आपली ओळख लपविण्यासाठी त्याने दाढी वाढविली आहे. वेषांतर केले आहे. शिवाय तो बी. बी. पाटील या नावाने वावरत होता.

अधीक्षक पाटील यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाला गुंगारा देत बोठे फरार झाला होता. शेवटी पोलिसांनीही अत्यंत गोपनीयता पाळत मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस सायबर सेलची मदत घेऊन सूत्रबद्धरित्या तपास केला. पथकातील पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन मोहीम फत्ते केली. जरे यांनी बोठेबद्दल पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्या गुन्हाही दाखल करण्याच्या तयारीत असल्याने आणि त्यातून आपली बदनामी होऊ नये, या कारणावरून बोठे याने सुपारी देऊन जरे यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. पाच आरोपी यापूर्वीच अटक करण्यात आले आहेत. आता त्याला मदत करणारे आणखी कोणी उघड झाले, तर त्यांनाही अटक केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या