Ticker

6/Breaking/ticker-posts

‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड

 


लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

मुंबई :‘ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा’… झपाटलेला फिल्मध्ये तात्या विंचूला असा विचित्र मृत्यूंजय मंत्र देणारा बाबा चमत्कारनं जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राघवेंद्र कडकोळ यांनी तीन दशकं मराठी नाटक-चित्रपट, मालिकांतून दमदार अभिनय केला. राघवेंद्र यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती . त्यांच्या निधनाने रंगभूमीने एक अष्टपैलू कलाकार गमावला आहे .

कर्नाटकी हेल काढत बोलणाऱ्या भूमिकाच त्यांच्या वाट्याला अधिक आल्या. ‘झपाटलेला’ चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका गाजली. ‘पळवापळवी’, ‘वाजवू का’ चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत कडकोळ यांची केमिस्ट्री भन्नाट जमली होती. ‘पंढरीची वारी’ चित्रपटातील राजा गोसावी, कडकोळ अण्णांची जुगलबंदी अविस्मरणीय होती. त्यांनी ‘ब्लक अँड व्हाईट’, ‘गौरी’, ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ‘छोडो कल की बात’ या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारली होती.
करायला गेलो एक हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी साकारलं. नाटकांच्या दौऱ्यांमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. अश्रूंची झाली फुले नाटकात त्यांनी धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती. धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. राघवेंद्र यांनी आपलं शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आणि नौदलात भरती होण्यासाठी परीक्षा पास केल्या.
भारतीय आयएनएस विभागात एका टीम सोबत त्यांना पाठवण्यात आलं. पण नंतर पुन्हा मेडिकल टेस्ट घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं. राघवेंद्र यांनी पुन्हा शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली.
नोकरी करत असताना राघवेंद्र यांनी रंगभूमीवर पडद्यामागे कलाकारांना निरोप देणं, चहा देणं, खुर्च्या मांडणं अशी मिळेल ती कामं केली. पण एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कुणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही. त्यांच्यातील कलागुणांमुळे त्यांना बालगंधर्व जीवन पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यांनी गोल्ड मेडल नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या निधनाने  रंगभूमीचं मोठ नुकसान झाले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या