Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक : मुकेश अंबानींच्या घराजवळ मध्यरात्री १वाजता स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क !

 

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश  अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एक राखाडी रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या तब्बल 20 कांड्या सापडल्या आहेत. तसंच एक धमकीचं पत्रही या गाडीमधून मिळाल्याची माहिती मिळतेय. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, स्फोटकांनी भरलेल्या या स्कॉर्पिओ गाडीबाबत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही गाडी बुधवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे

1 नव्हे तर 2 गाड्या!

अंबानी यांचं घर दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर आहे. या परिसरात बुधवारी मध्यरात्री राखाडी रंगाची एक स्कॉर्पिओ दाखल झाली. नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या ठिकाणीच ही गाडी उभी होती. महत्वाची बाब म्हणजे या स्कॉर्पिओ गाडीसोबत त्या ठिकाणी अजून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीही होती. इनोव्हा गाडी ही बरोबर स्कॉर्पिओच्या मागेच होती. अंबानी यांच्या घराजवळ या दोन्ही गाड्या दाखल झाल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीची लाईट बंद करण्यात आली. त्यानंतर मागे थांबलेली इनोव्हा गाडी स्कॉर्पिओ गाडीच्या काहीशी पुढे निघून गेली.

काही वेळ कुणीही उतरलं नाही!

काही वेळ गेला तरी स्कॉर्पिओ गाडीतून कुणीही खाली उतरलं नाही. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीतील व्यक्ती उतरते आणि पुढे उभी असलेल्या इनोव्हा गाडीत बसते आणि तिथून ती इनोव्हा गाडी निघून जाते, अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.

 

दुकानाच्या सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद

अंबानी यांच्या घराजवळ जिथे गाडी उभी होती. तिथे समोरच एक दुकान आहे. त्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. ज्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला त्या दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, गाडीत नेमके किती लोक होते हे कळू शकलेलं नाही. पण स्कॉर्पिओ गाडीत ड्रायव्हिंग करताना एक व्यक्ती दिसतो. संबंधित दुकानदाराने सकाळी साडे आठच्या सुमारास दुकान उघडलं. त्यानंतर दुपारी 12 नंतर ट्राफिक पोलिसांचे कर्मचारी आले आणि त्यांनी गाडीच्या चाकाला लॉक लावलं. त्यानंतर दुपारी 3 वाजता पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि अन्य यंत्रणा आली आणि त्यांनी गाडीचा तपास सुरु केल्याचं या दुकानदाराने सांगितलं.

स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या, धमकीचं पत्र!

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या आणि स्फोटकांनी भरलेल्या गाडीत जिलेटीनच्या तब्बल 20 कांड्या सापडल्या आहेत. तशी माहिती खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच दिली आहे. इतकच नाही तर या गाडीमध्ये एक धमकीचं पत्रही मिळालं आहे. यात कुठल्याही दहशतवादी संघटनेचं नाव नाही. मात्र, हा केवळ इशारा असल्याचंही या पत्रात म्हटलं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्यात आल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या