Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठा क्रांती मोर्चाकडून सेना भवनसमोर शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

मुंबई : मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आज शिवसेना भवनासमोर शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. मागील काही दिवसांपूर्वी शिवजयंती साजरी करण्यासाठी काही निर्बंध सरकारने लावले होते. याचा निषेध करत मराठा क्रांती मोर्चाने शिवजयंती साजरी करू न दिल्यास आम्ही शिवसेना भवनासमोर शिवजयंती साजरी करू अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा घेतला होता.


याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक अंकुश कदम म्हणाले की, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांच्या ठीक ठिकाणी सभा होत आहेत. दौरे देखील होत आहेत. याला हजारोंची गर्दी देखील उपस्थित असते. यावेळी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स देखील पाळले जात नाही. अनेकजण मास्क देखील घालत नाहीत. अशी परिस्थिती असताना देखील मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. परंतु, शिवजयंतीला मात्र महाविकास आघाडी सरकारने साजरी करण्याबाबत अनेक निर्बंध लादले होते. ही बाब अत्यंत चुकीची आहे.

 

 काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईमध्ये एक मोठी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या ट्रॅक्टर रॅलीला मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोरोना विषयक सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले होते. परंतु, तरीदेखील कोणत्याही प्रकारची कारवाई या सर्व कार्यकर्त्यांवर आणि नाना पटोले यांच्यावर देखील झाली नाही. याचा निषेध आम्ही करत आहोत. एकीकडे मंत्र्यांना परवानगी द्यायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील बांधवांना शिवजयंती साजरी करण्यापासून रोखायचं असा दुटप्पीपणा महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने पाहायला मिळत आहे.


आज आम्ही अत्यंत शांततेत शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करत होतो. या वेळी कोरोना विषयक सर्व नियम पाळण्यात देखील आले होते. परंतु, तरी देखील आम्हाला पोलिसांनी शिवजयंती साजरी करू दिली नाही. आमच्यासोबतच राज्यभरातून मुंबईमध्ये जे कार्यकर्ते येणार होते, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. अशा प्रकारची दडपशाही महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार होताना पाहायला मिळत आहे. आम्ही या कारवाईचा निषेध करतो. आम्हाला जरी पोलिसांनी अटक केली तरी आम्ही जामीन घेणार नाही. आम्ही आमचं आंदोलन जेलमध्ये देखील सुरू ठेवणार आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या