Ticker

6/Breaking/ticker-posts

नशिबवान ! खाणीत राबणाऱ्या मजुरांना सापडले हिरे..!!

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पन्ना (मध्य प्रदेश) :- मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात खोदकाम करता करता मजुरांच्या हाती हिरे लागल्याची घटना समोर आलीय. या हिऱ्यांची किंमत जवळपास ३५ लाखांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. हिरे सापडल्यानंतर ते प्रशासनाच्या ताब्यात देऊन या मजुरांनीही आनंदाचे क्षण अनुभवले. लिलाव झाल्यानंतर त्यातून जमा झालेले पैसे सरकारी कर कपात करून उरलेले पैसे या मजुरांना दिले जाणार आहेत.
मध्य प्रदेशचा पन्ना जिल्हा हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्ना जिल्ह्यातील एका गावात खोदकाम सुरू होतं. यावेळी
इट्वाखास गावातील रहिवासी असणाऱ्या भगवानदास कुशवाह आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या काही श्रमिकांना खोदकाम करताना काहीतरी चमकताना दिसलं. त्यांनी निरखून पाहिल्यानंतर ते हिरे असल्याचं लक्षात आलं.

भगवानदास कुशवाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेले हिरे ७.९४ कॅरेट आणि १.९३ कॅरेटचे आहेत. लाखांच्या घरात या हिऱ्यांना बाजारात किंमत मिळू शकते.
हिरे सापडल्यानंतर आपला भाग्योदय झाल्याची जाणीव या मजुरांना झाली. आपल्या कुटुंबासाठी, मुलांच्या भविष्यासाठी आता ते स्वप्न पाहत आहेत.
आपल्यासहीत पाच मजूर खोदकामाचं काम करत असताना आपल्याला हिरे आढळले. आपल्याला सापडलेले हिरे आपण स्थानिक हिरा कार्यालयात जमा केले आहेत. या हिऱ्यांतून मिळणाऱ्या रक्कमेतून आपल्या कुटुंबाच्या समस्या कमी होऊ शकतील. तसंच मुलांच्या शिक्षणासाठी हा पैसा उपयोगी पडेल, असं भगवानदास कुशवाह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

जिल्हाधिकारी संजय कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाद्वारे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात इतर दोन हिऱ्यांसोबत मजुरांना सापडलेल्या दोन हिऱ्यांचाही लिलाव केला जाणार आहे. या लिलावातून येणारी रक्कम सरकारी कर वजा करून कुशवाह आणि त्यांच्या साथीदारांना देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या